ज्या आठ माजी नौसैनिकांना कतारने फाशीची शिक्षा सुनावली होती, त्यांची सुटका करण्यात भारत सरकारला यश मिळालं आहे. भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे तब्बल आठ वर्षभरानंतर ते भारतात परतले आहेत. त्यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यामुळे त्यांना आधी फाशीची नंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु, भारत सरकारने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत त्यांची शिक्षा रद्द करून त्यांचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे या नौसैनिकांनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. देशात परतलेल्या आठपैकी सात नौसैनिकांनी ‘भारत माता की जय’ म्हणत दिल्ली विमानतळावरून बाहेर पडले.
“आम्ही भारतात सुरक्षितपणे परतलो याचा आम्हाला खूप आनंद आहे. निश्चितपणे, आम्ही पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो, कारण हे केवळ त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपामुळेच शक्य झाले”, असे त्यांच्यापैकी एकाने सांगितले.
“पंतप्रधान मोदींच्या हस्तक्षेपाशिवाय आम्हाला इथे पोहोचणे शक्य झाले नसते. आणि भारत सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे हे घडले आहे”, असंही एका नौसैनिकाने म्हटलं.
“आम्ही भारतात परत येण्यासाठी जवळजवळ १८ महिने वाट पाहिली. आम्ही पंतप्रधानांचे अत्यंत आभारी आहोत. त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपाशिवाय कतारबरोबरचे त्यांचे समीकरण हे शक्य झाले नसते. आम्ही मनापासून भारत सरकारचे आभारी आहोत. भारत सरकारच्या प्रयत्नांशिवाय आजचा दिवस पाहता आला नसता, अशी प्रतिक्रिया एका नौसैनिकाने दिली.
काय घडलं होतं २०२३ मध्ये?
कतारमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. २०२३ मधलं म्हणजेच गेल्यावर्षी प्रकाशात आलेलं हे प्रकरण आहे. कतारमधील यंत्रणेने त्यांना ३० ऑगस्ट २०२२ रोजी अटक केली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने २६ ऑक्टोबर २०२३ रोजी या कतारने जो मृत्यूदंडाचा निर्णय सुनावला होता त्याविषयी एक निवेदन जारी करून या निकालाबाबत चिंता व्यक्त केली. “भारताच्या आठ माजी नौसैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्याचा निर्णय अनपेक्षित असून, आम्ही तपशीलवार निकालाच्या प्रतीक्षेत आहोत. आम्ही सर्व कायदेशीर पर्यायांचा वापर करून, त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करू” असं त्यावेळी भारताने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता आज या नौसैनिकांची सुटका झाली आहे.
हेही वाचा >> कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या आठ माजी नौसैनिकांची सुटका, भारताच्या कूटनीतीचं मोठं यश
नौदलाचे ते आठ माजी सैनिक कोण?
कतारने ज्या माजी सैनिकांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती, त्यामध्ये नौदलाच्या मोठ्या निवृत्त अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुणाकर पाकला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश अशी या नौसैनिकांची नावे आहेत. कतारमधील अल दाहरा ग्लोबल टेक्नोलॉजीस अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीत ते कार्यरत होते. या कंपनीमार्फत संरक्षणविषयक सेवा दिली जाते.