Shakti Dubey 1st Rank UPSC CSE 2024 Result : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून उत्तर प्रदेशच्या शक्ती दुबे या तरुणीने या परीक्षेत पहिला क्रमांक पटकावला आहे. पाचव्या प्रयत्नात ती यशस्वी ठरली असून थेट पहिल्या क्रमांकावरच तिने झेप घेतली आहे. आपल्याला मिळालेल्या यशानंतर तिने एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी तिने तिच्या भावना व्यक्त केल्या.

“थोड्यावेळाकरता मला यावर विश्वास बसत नव्हता. पण आता हळूहळू आता विश्वास बसतोय. खूप वर्षांआधी पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होतंय”, असं शक्ती दुबे म्हणाली. कधी वाटलं होतं का रँक १ मिळेल? त्यावर शक्ती दुबे म्हणाली, “मी असा विचार केला नव्हता, पण माझ्या भावाला असा विश्वास होता. गेल्यावर्षी जेव्हा मला मुलाखतीत कट ऑफ मार्क्स मला मिळाले नव्हते तेव्हा तो म्हणाला होता की काळजी करू नको, तुला देवाने रँक १ साठी राखीव ठेवलंय.”

निकाल पाहण्यासाठी काय पूर्वतयारी केली? त्यावर शक्ती म्हणाली, “मला माहीत होतं की आज निकाल येणार आहे. दुपारी १ च्या दरम्यान निकाल लागणार होता. मी ठरवलेलं की फोन बाजूला ठेवून झोपून राहायचं. पण झोप लागत नव्हती. संकेतस्थळावर पीडीएफ अपलोड झाल्यानंतर मी लगेच चेक केलं. निकाल पाहिल्यानंतर मी लगेच वडिलांना फोन केला. मग आईला फोन केला. त्यानंतर इन्स्टिट्युटकडूनच मला फोन आला. मी सरांना म्हटलं की मी खूप घाबरलेय, मला माहीत नाही की पीडीएफ खरी आहे की फेक आहे. पण सर म्हणाले की आम्ही रोल नंबर चेक केलाय. तुमचाच क्रमांक आलाय. तेव्हा मला विश्वास बसला. म्हटलं हे खरंच प्रत्यक्षात घडतंय.”

शक्ती दुबे ही मुळची उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील आहे. येथील यूपीएससीच्या परीक्षार्थींना काय सल्ला देशील यावर शक्ती म्हणाली, “प्रयागराज माझी जन्मभूमि आहे. या जन्मभूमिने मला घडवलं आहे. प्रत्येकाला मेहनत करावी लागते. कुठेतरी काहीतरी चूक राहते आणि आपण मागे राहतो. पण कुठे काय चुकतंय हे तपासलं पाहिजे. पण यूपीएससी आपल्या आयुष्यातील एक भाग आहे, पण हे आयुष्य नाही हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावं”, असं ती म्हणाले.

चार परीक्षांचे अपयश कसं पचवलं?

शक्ती दुबेने यूपीएससीची पाचवेळा परीक्षा दिली. चारवेळा नापास झाल्यावर ती पाचव्यांदा पहिल्या क्रमांकाने पास झाली. याबाबत ती म्हणाली, “जर तुम्हाला तुमच्यावर विश्वास असेल, झालेल्या चुका टाळता येऊ शकतात आणि पालकांचा तुमच्यावर विश्वास असेल तर अपयश पचवता येतं”, असंही शक्ती दुबे म्हणाली.