पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोप्रा विधानसभेत एका जोडप्याला रस्त्यावर शेकडो लोकांच्या समोरच बेदम मारहाण करण्यात आली होती. विवाहबाह्य संबंध ठेवल्यामुळे स्वंयघोषित न्यायालय चालविणाऱ्या एका व्यक्तीनं ही मारहाण केली होती. सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारवर टीका करण्यात आली. सदर घटनेत ज्या पुरुषाला मारहाण झाली होती, त्याची प्रतिक्रिया आता समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, पीडित असूनही त्याने या घटनेचं समर्थन केलं आहे. जे झालं ते चांगलंच झालं, अशी प्रतिक्रिया दिल्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

उत्तर दिनाजपूर जिल्ह्यात आरोपी ताजिमूल इस्लाम उर्फ जेसीबी हा स्वंयघोषित न्यायालय चालवत होता. चोप्रा विधानसभेचे आमदार हमीदूल रहमान यांचा तो निकटवर्तीय असल्याचं सागंतिलं जातं. व्हायरल व्हिडीओमध्ये हमीदूल जोडप्याला काठ्यांनी बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे. यावेळी शेकडो लोकांनी जोडप्याच्या बाजूला घोळका केला असून ते बघ्याची भूमिका घेत असल्याचेही दिसत आहे.

“मुस्लीम राष्ट्रात असंच…”, जोडप्याला मारहाण प्रकरणी तृणमूलच्या आमदाराचे अजब विधान

या घटनेतील पीडित पुरुषाशी इंडिया टुडेने संवाद साधला. मारहाण झाल्यानंतरही मी आता कायदेशीर कारवाई करण्यास इच्छुक नसल्याचे त्याने सांगितले. “स्वंयघोषित न्यायालयाने दिलेली शिक्षा मला मान्य आहे. जे झालं ते चांगलंच झालं. आता हे प्रकरण निवळलं आहे. आम्हाला शांततेनं जगायचं आहे. मला माझ्या आयुष्यात आणखी काही मनस्ताप नको आहे”, अशी प्रतिक्रिया सदर पीडित व्यक्तीनं दिली.

पीडित व्यक्तीनं पुढं सांगतिलं की, मी चूक केली. विवाहित असूनही मी त्या महिलेला माझ्या घरी आणायला नको होतं. त्यामुळे स्वंयघोषित न्यायालयाने आम्हा दोघांनाही जाहिररित्या फटके देण्याची शिक्षा सुनावली. ही शिक्षा मी मान्य केली आहे. त्यामुळंच मी जाहिरपणे शिक्षा भोगली. आता आरोपीविरोधात माझी कोणतीही तक्रार नाही. मला फक्त शांतता हवी आहे.

अन्वयार्थ: बेकायदा न्यायाची ‘तृणमूल’ शैली

“आमच्या समाजात अनैतिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे. त्यामुळे आमच्या समाजाच्या बैठकीत मला शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर आम्ही आता शांतपणे नांदू इच्छितो”, असेही पीडित व्यक्तीने सांगितले. दरम्यान ज्या महिलेला मारहाण करण्यात आली, तिने मात्र या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.