केंद्र सरकारने ४ महिन्यांपूर्वी जारी केलेल्या नव्या आयटी नियमावलीनुसार सोशल मीडिया कंपन्यांना काही गोष्टींची बंधने घालण्यात आली आहेत. त्यानुसार, तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती, मूळ संदेश निर्मात्याची माहिती वगैरे नियमांसोबतच दर महिन्याचा नियम पाळत असल्याचा अहवाल देखील या कंपन्यांना सादर करावा लागणार आहे. त्यामध्ये त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी आणि त्यावर त्यांनी केलेल्या कृतीची माहिती केंद्र सरकारला सादर करावी लागणार आहे. या नियमाच्या पार्श्वभूमीवर मेसेजिंग अॅप असलेल्या WhatsApp नं आपला अहवाल सादर केला असून त्यामध्ये महिन्याभरात तब्बल २० लाख भारतीय खाती बंद केल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
महिन्याभरात ३४५ तक्रारी!
१५ मे ते १५ जून या कालावधीसाठीचा व्हॉट्सअॅपचा अहवाल सादर करण्यात आला असून त्यातून ही माहीती समोर आली आहे. व्हॉट्सअॅपने या अहवालात नमूद केल्याप्रमाणे १५ मे ते १५ जून या कालावधीमध्ये कंपनीकडे एकूण ३४५ तक्रारी आल्या. यामध्ये खाती बंद करणे, तांत्रिक अडचणी, व्हॉट्सअॅपबद्दलची माहिती, सुरक्षेसंदर्भातील तक्रार अशा अनेक तक्रारींचा समावेश होता. या तक्रारींच्या आधारावर व्हॉट्सअॅपनं एकूण ६३ खाती बंद केली आहेत.
जगभरात ८ लाख खाती बंद!
दरम्यान, बंद करण्यात आलेल्या २ लाख खात्यांपैकी बहुतांश खाती ही कोणत्याही वापरकर्त्याच्या तक्रारीशिवाय कंपनीकडून स्वत:हून बंद करण्यात आल्याचं देखील व्हॉट्सअॅपनं नमूद केलं आहे. भारतातील २ लाख खात्यांसह जगभरात व्हॉट्सअॅपनं एकूण ८ लाख खाती बंद केल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
WhatsApp चे नवीन फिचर: मेसेजमधील फोटो,व्हिडिओ एकदा पाहिल्यानंतर लगेच होणार डिलीट!
बंद करण्यात आलेल्या खात्यांपैकी जवळपास ९५ टक्के खाती ही बल्क मेसेज सुविधेचा गैरवापर करणारी असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळेच या खात्यांवर कारवाई करण्यात आली. २०१९ सालापासून बंद करण्यात येणाऱ्या खात्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. व्हॉट्सअॅपच्या अंतर्गत सुरक्षा प्रणालीमध्ये मोठे बदल झाले असून त्याचा परिणाम म्हणून खाती बंद होण्याचं प्रमाण वाढल्याचं व्हॉट्सअॅपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.