यापुढे तुम्ही तुमच्या मुलांना फेसबुक, व्हॉट्स अॅप वगैरे वापरण्यापासून लांब ठेवत असाल तर खबरदार! कारण यामुळे तुमच्या मुलांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कदाचित ते शाळेत एका विषयात नापासही होऊ शकतात. कदाचित त्यांच्या गुणांवर याचा परिणाम होऊन त्यांची गुणपत्रिकेवरील टक्केवारीही घसरू शकते. या ओळी वाचून तुम्हीही गोंधळत पडला असाल पण, हा गोंधळ भविष्यात आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण लवकरच दहावीच्या पाठ्यपुस्तकात फेसबुक आणि व्हॉट्स अॅप यांसारख्या आणि आजच्या पिढीसाठी अत्यावश्यक असलेल्या ‘अतिमहत्त्वाच्या’ विषयाचा समावेश होणार आहे.
पुढील वर्षांत दहावीच्या अभ्यासक्रमात हे दोन विषय सहभागी करून घेण्याचा निर्णय शिक्षण मंत्रालयानं घेतला आहे. हे दोन विषय गुण वाढवण्याच्या दृष्टीनं तसेच विद्यार्थ्यांचं ‘समान्य ज्ञान’ वाढवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे असून महाविद्यालयात गेल्यानंतर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी याचा अधिक फायदा होणार असल्याचं शिक्षण मंत्र्यांचं म्हणणं आहे. या निर्णयावर अर्थात काही पालकांनी आक्षेप घेतला आहे. पण, शिक्षण विभागानं हे दोन विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करुन घेतल्यानं त्याचा कसा फायदा होणार आहेत हे परीपत्रक प्रसिद्ध करून पालकांना समजावून सांगितलं आहे. यासाठी त्यांनी संशोधन करून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळवली आहे. त्याचप्रमाणे पालकांनी सरकारच्या निर्णयाला का विरोध करून नये हे उदाहरणासह पटवून दिलं आहे.
पालकांनी का विरोध करू नये?
– शिक्षण विभागानं केलेल्या सर्वेक्षणानुसार देशातील सरासरी ७० % पालक व्हॉट्सअॅप किंवा फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करतात. त्यातून शहरी भागात राहणारे ८० % पालक दिवसातून किमान ११ तास व्हॉट्स अॅपवर ऑनलाइन असतात. यात दुसऱ्यांचे डिपी चेक करणं , फॅमिली ग्रुपमध्ये सतत न चुकता गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनूनचे मेसेज करणं, वेगवेगळ्या रेसिपी किंवा व्हॉट्स अॅपवर आलेले फेक मेसेजही खरं समजून शेअर करण्यात पालक आघाडीवर आहेत.
– फेसबुकच्या बाबतीतही तिच गत पालकांची आहे. शहरी भागातील ९०% पालक हे फेसबुकवर असतात. फेसबुकवर स्टेटस अपडेट न करता सतत स्क्रोलिंग किंवा स्टॉक करून माहिती मिळवण्यात पालकांना समाधान मिळतं असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. जर पालकच मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या अधीन असतील तर विद्यार्थ्यांनी या गोष्टींचा अभ्यास करण्यात काय गैर आहे असा सवाल विभागानं केला आहे. ही महत्त्वाची बाब आकडेवारीसह उघड झाल्यानं पालकांनी या गोष्टीला विरोध करून नये असं त्यांना सांगितलं आहे.
ही आकडेवारी समोर ठेवल्यानंतरही काही पालकांनी या सर्वेक्षणावर विश्वास ठेवणं अवघड असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या समाधानासाठी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा अभ्यासक्रमात समावेश करुन घेणं किती महत्त्वाचं आहे हे फायद्या आणि तोट्यासह विभागानं पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
हे दोन विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करुन घेण्याचे फायदे आणि तोटे
– आजकाल दहावीचे पेपर व्हॉट्स अॅपवर फुटतात. जर तुमच्या मुलाला व्हॉट्सअॅपचं सखोल ज्ञान असेल आणि तुमचा मुलगा अभ्यासात सुमार असेल तर हे पेपर व्हॉट्सअॅपमार्फत मिळवण्याचा त्याचा मार्ग अधिक सोपा होईल. व्हॉट्स अॅप या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश असल्यानं या माध्यमाविषयी सखोल ज्ञान त्याला असेल त्यामुळे व्हॉट्सअॅपवर पेपर फुटला आहे आणि तो आपल्याला मिळाला आहे ही बाब इतर अभ्यासू विद्यार्थ्यांपासून कशी लपवून ठेवावी या कलेत तो अल्पावधीत निष्णात होईल. त्यामुळे आपोआप वर्षभर मेहनत न करता परीक्षेच्या आधीच त्याच्या हातात प्रश्नपत्रिका येऊन तो त्यात चांगल्या मार्कानं पासही होऊ शकतो.
– आता हा जसा फायदा आहे तसाच याचा तोटाही समजून सांगण्यात आला आहे. समजा व्हॉट्स अॅप मार्फत असेच पेपर वर्षानुवर्षे फुटत राहिले आणि तुमच्या मुलाला ते मिळालेच नाही तर? यामुळे त्याचं किती नुकसान होऊ शकतं नाही का? जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो त्याला परीक्षेत काय येणार हेच माहिती नसेल, प्रश्नपत्रिकाच परीक्षेच्या आधी त्याच्या हातातच येणार नसेल तर वर्षभर मेहनत करून काय फायदा? शेवटी एवढी ‘पोपटपंची’ करून सारं व्यर्थच की नाही. त्यातून फेरपरीक्षेला राजकारण्यांचा विरोध त्यामुळे तुमचं हुशार मुलं मेहनत करूनही मागेच राहणार, तेव्हा बऱ्याबोलानं हा विषय अभ्यासक्रमात सहभागी करून घेणं हेच शहाणपणाचं ठरेल.
– व्हॉट्स अॅपचा अभ्यासक्रमात समावेश करून घेण्याचा दुसरा फायदा असा की लिहण्याचे कष्ट न घेता नोट्स मिळवताही येतील. एकानं नोट्स लिहियाच्या मग बाकींच्यांनी त्याचे फोटो काढून भराभर इतरांना फॉरवर्ड करून टाकायचं. म्हणजे काय तुमच्या मुलाचे लिहण्याचे कष्ट वाचतील, पेनं, वह्या यावर दहावीच्या वर्षांत किती खर्च होतो हे पालक म्हणून आपण समजू शकतोच. व्हॉट्सअॅपवर नोट्सचे फोटो पाठवले की तुमचे किती पैसे वाचतील याचा हिशोब तुम्हीच करा.
– आता हा मुद्दा पालकांना पटला असेलच. ज्यांना नाही पटला त्यांनी साधा हिशोब मांडावा. शिक्षकांनी सांगितलेले महत्त्वाचे मुद्दे वहीवर उतरून घ्यायचे म्हणजे वर्षांला प्रत्येक विषयाच्या २ वह्या याप्रमाणे किमान तीन डझन वह्या लागतात, त्यातून प्रिंट आऊट वगैरे काढायच्या म्हणजे प्रत्येकी १रुपयाप्रमाणे किती खर्च येतो याचं गणित मांडा. आता आपला मुलगा/मुलगी दहावीला आहे म्हटल्यावर तुम्ही शाळेव्यतिरिक्त खासगी शिकवण्यांची कमाल लाखभरतरी फी भरतात त्यात कशाला हवाय हा अतिरिक्त खर्च. त्यापेक्षा व्हॉट्स अॅप बरं नाही का? आता हे झाले व्हॉट्सअॅपचे फायदे आणि तोटे (व्हॉट्स अॅपचे फायदे आणि तोटे यांची अधिक विस्तृत माहिती पालकांना त्यांच्या व्हॉटसअॅपवर फॉरवर्ड करण्यात येणार आहे. याची नोंदही पालकांनी घ्यावी.)
त्यानंतर फेसबुकच्या अभ्यासक्रमाचे फायदे आणि तोटेही थोडक्यात शिक्षण विभागानं सांगितले आहेत. ते सांगताना मुलांच्या व्यक्तीमत्त्व विकासाशी याची सांगड घालण्यात आली आहे.
-. फेसबुकपासून विद्यार्थ्यांना पालकांनी लांब ठेवू नये. उलट दहावीच्या काळात मुलांना अधिक फेसबुक वापरू आणि समजू द्यावं. फेसबुकमुळे मुलं एकमेकांशी जोडली जातात. आता दहवीनंतर जेव्हा मुलं अकारावीत जातील तेव्हा इतर शाळांतून आलेल्या नव्या विद्यार्थ्यांसोबत जुळवून घेताना त्यांना हेच फेसबुक उपयोगी पडेल. मुलांना जर दहावीतच फेसबुक समजलं तर त्यांना आधिच ‘दुनियादारी’ कळेल. जेणेकरून महाविद्यालयात गेल्यानंतर आपल्यासोबत नवी चेहरे पाहून ते घाबरून जाणार नाहीत, त्यांच्यात एकप्रकारचा आत्मविश्वास निर्माण होईल.
-. जर मुलं फेसबुकवरच नसतील तर त्यांना आजूबाजूच्या जगाचं ‘सामान्य ज्ञान’ मिळणार नाही. परिणामी त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होणार नाही. ते एकलकोंडे होतील, त्यांच्यात न्यूनगंड वाढेल यातून त्यांचंच नुकसान होईल हे शिक्षण विभागानं पालाकांना ठासून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
– शिवाय भविष्यात तुमच्या मुलानं राजकारणात जायचं ठरवलं तर फेसबुक लाईक्सचा आणि युजर्सच्या खासगी माहितीचा वापर करून आपल्या बाजूनं कसं वातावरण निर्माण करता येईल याचीही कला खूप कमी वयापासून त्यांना अवगत होईल. यासाठी पालकांना केंब्रिज अॅनालिटीकानं कशी डोनाल्ड ट्रम्प सारख्या राजकारणातील ‘ढ’ विद्यार्थ्याला महासत्तेची चावी दिली हे उदाहरणासह प्रभावीपणे पटवून दिलं. त्याचप्रमाणे इतर फायदे समजून घ्यायचे असतील तर आपलं फेसबुक पेज फॉलो करण्याची विनंती सरकारनं केली आहे. याद्वारे फायदे आणि तोट्यासंबधी शिक्षण मंत्रालय येत्या काळात जी पोस्ट टाकतील तिची सर्व माहिती त्यांना या पेजवर पाहता येणार आहे.
शिक्षण विभागाकडून हे महत्त्वाचे मुद्दे अधोरेखीत करण्यात आल्यानंतर बहुतांश पालकांचा या निर्णयाला असलेला विरोध मावळला असून दहावीच्या अभ्यासक्रमात व्हॉट्स अॅप आणि फेसबुकचा समावेश करून घेण्याचा शिक्षण मंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे २०१८ पासूनच्या दहावीच्या अभ्यासक्रमात हे विषय सहभागी होणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्हतब झाली आहे.
(हे वृत्त एप्रिल फूल असून भविष्यात खरोखर असं काही घडलं तर तो योगायोग समजावा)