WhatsApp हे तुमच्या आमच्या दैनंदिन आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालं आहे. मात्र त्याच्याशी जोडले गेलेले घोटाळे हा देखील चिंतेचा विषय ठरतो आहे. जाणून घेऊ. WhatsAPP इमेज स्कॅम हा नवा प्रकार आता चर्चेत आला आहे हा प्रकार नेमका काय ? समजून घेऊ.

जबलपूरच्या एका व्यक्तीची फसवणूक

अलिकडेच, मध्य प्रदेशातील जबलपूरमधील एका व्यक्तीला एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सॲपवर एक फोटो आला. पीडितेने त्या फोटोवर क्लिक करताच त्याचा मोबाईल हॅक झाला आणि काही मिनिटांतच त्याच्या बँक खात्यातून २.०१ लाख रुपये काढण्यात आले. या सायबर फसवणुकीला ‘व्हॉट्सॲप इमेज स्कॅम’ किंवा ‘मॅलिशियस लिंक स्कॅम’ असे म्हणतात, जे खूप धोकादायक आहे. एका चुकीच्या क्लिकमुळे तुमची वैयक्तिक माहिती आणि बँक खात्याचे तपशील स्कॅम करणाऱ्याला कळतात.

व्हॉट्सॲप इमेज स्कॅम म्हणजे नेमकं काय?

ऑनलाइन फसवणुकीची एक नवीन पद्धत आहे. यामध्ये, फसवणूक करणारा व्यक्ती एका अनोळखी नंबरवरून फोटो पाठवतो. या फोटोमध्ये एक लिंक असते. एखाद्याने त्या फोटोवर किंवा लिंकवर क्लिक करताच, त्याच्या फोनमध्ये व्हायरस किंवा हॅकिंग ॲप इन्स्टॉल होते. तंत्रज्ञानाच्या भाषेत, याला ‘ट्रोजन हॉर्स अटॅक’ किंवा ‘रिमोट ॲक्सेस ट्रोजन’ (RAT) घोटाळा असेही म्हणता येईल, कारण यामध्ये फसवणूक करणारे वापरकर्त्याच्या मोबाइलचा कब्जा घेतात आणि फ्रॉड करतात.

Whats App इमेज स्कॅम टाळण्यासाठी काय कराल?

व्हॉट्सॲप इमेज स्कॅम टाळण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची सतर्कता. जर तुम्हाला एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून कोणताही फोटो, कागदपत्रे किंवा लिंक मिळाली, तर ती तपासल्याशिवाय उघडू नका. कधीकधी या फाइल्स सामान्य दिसतात, परंतु त्यामध्ये लपलेला व्हायरस तुमच्या फोनमध्ये प्रवेश करू शकतो आणि तुमची व्यक्तिगत माहिती चोरू शकतो. टेलिग्राम, फेसबुक मेसेंजर, ईमेल सारख्या कोणत्याही मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर देखील हा स्कॅम होऊ शकतो म्हणून, कोणतीही अनोळखी लिंक किंवा फोटो उघडण्यापूर्वी काळजी घ्या.

लक्षात ठेवा या सोप्या गोष्टी

कुठल्याही अनोळखी व्यक्तीद्वारे, क्रमांकाद्वारे पाठवण्यात आलेल्या फोटो किंवा व्हिडीओ लिंकवर क्लिक करु नका.

WhatsApp चा ऑटो डाऊनलोड पर्याय बंद करा

अँटी व्हायरस किंवा अँटी मालवेअर अॅप्सचा उपगोय करा

ज्या लोकांविषयी, क्रमांकांविषयी संशय वाटतो आहे अशा लोकांच्या ऑफर्सकडे दुर्लक्ष करा.

WhatsApp ऑटो डाऊन लोड बंद कसं कराल?

WhatsApp उघडा त्यानंतर सेटिंग्जमध्ये जाऊन स्टोअरेज आणि डेटा हा पर्याय बघा, त्यात मीडिया ऑटो डाऊनलोडचं बटण असेल ते बंद करा. Wifi, मोबाइल डेटा आणि रोमिंग या तिन्हीसाठीचा चेकबॉक्स अनचेक करा.