स्थानिक पत्रकाराने आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिसवा सरमा यांना पाठवलेल्या व्हॉट्सअॅप संदेशानंतर अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. आसामच्या दरांग जिल्ह्यात एसएसबी जवानाच्या घरी घरकाम करणाऱ्या १३ वर्षीय तरुणीचा बलात्कारानंतर खून झाला होता. याप्रकरणी एसएसबी जवान क्रिष्णा कमल बरुवावर सीआयडीने आरोपपत्र दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना लाच देत तरुणीच्या खुनाला आत्महत्येचे स्वरुप दिले का? याबाबत सीआयडीकडून तपास केला जात आहे.
“पीडितेच्या कुटुंबाच्या आरोपांचा संदर्भ देत एका स्थानिक पत्रकाराने मला या प्रकरणाबाबत व्हॉट्सअप संदेश पाठवला होता. यानंतर मी दरांगच्या पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणाचा अहवाल मागितला होता. मी चौकशी केल्यानंतरच या प्रकरणात आरोपींना अटक झाली, यामुळे माझ्या मनात अहवालाबाबत शंका निर्माण झाली. त्यामुळे या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचे आदेश मी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे”, अशी माहिती सरमा यांनी दिली आहे.
या प्रकरणात सीआयडीने काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. शिवाय निलंबित पोलीस अधीक्षक आणि धुला पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनाही सीआयडीने अटक केली आहे. बलात्कार झाला नसल्याचा खोटा शवविच्छेदन अहवाल देणाऱ्या डॉक्टरांना आणि न्यायदंडाधिकाऱ्यांनाही या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे.
“मी उंच नाही, माझे स्तन…” बॉलिवूड अभिनेत्रीचा मुलाखतीमध्ये धक्कादायक खुलासा
अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली तेव्हा दरांग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राज मोहन रॉय होते. त्यांनी आरोपीच्या कुटुंबीयांकडून दोन लाखांची लाच घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खटला कमकुवत करण्यासाठी आरोपीची मदत केल्याचा रॉय यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, मुख्यमंत्री सरमा आणि आसामचे पोलीस महासंचालक भास्कर ज्योती महान्ता यांनी पीडित मुलीच्या कुटुंबियांना भेट दिली आहे. या प्रकरणात पीडितेला न्याय देण्याचे आश्वासन सरमा यांनी दिले आहे.