नवी दिल्ली :आपल्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेले ‘व्हॉट्सअॅप’ आता अधिक विस्तारणार असून वापरकर्त्यांना जास्तीच्या सुविधा दिल्या जाणार आहेत. आता एकाच वेळी ३२ जणांना ‘व्हॉईस किंवा व्हिडिओ कॉल’ करता येईल, तर ‘ग्रूप’मध्ये १,०२४पर्यंत सदस्यांना घेता येईल. तसेच २ गेगाबाईटपर्यंत फाईलींचे हस्तांतरण करणेही आता शक्य होणार आहे.
व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या ‘मेटा’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकद्वारे ही माहिती दिली. व्हॉट्सअॅपवर ‘कम्युनिटी’ ही नवी सेवा देण्यात येणार असून त्यात ‘ग्रूप’ आणि ‘सब-ग्रूप’ करणे शक्य होणार आहे. तसेच या समाजमाध्यमाद्वारे विविध ‘जनमत’ (पोल) घेण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. नव्या बदलांबाबत एप्रिलमध्येच घोषणा करण्यात आली होती. आता त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून येत्या काही आठवडय़ांत सर्व वापरकर्त्यांना टप्याटप्याने या सुविधा उपलब्ध केल्या जातील.