देशातील नागरिकांसाठी ‘अच्छे दिन’ आलेत का याबाबत संभ्रम असला तरी सध्या गांधी परिवारात मात्र, ‘अच्छे दिना’चे वारे वाहत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी मेनका गांधी यांनी भ्रष्टाचाराला आळा कसा घालावा यासाठी सोनियांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा, असा सल्ला सरकारी अधिकाऱ्यांना दिला होता. मेनका यांनी केलेल्या जाऊबाईंच्या कौतुकामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आता मेनका आणि सोनिया यांच्या दोन्ही पुत्रही एकमेकांशी सामजंस्याने वागताना दिसत आहेत. संसदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत राहुल आणि वरूण गांधीतील दिलजमाई पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये वरूण यांनी राहुल गांधींवर टीका करण्याची कोणतीही संधी सहसा गमावलेली नाही. मात्र, स्थायी समितीच्या बैठकीत परदेशस्थ नागरिकांशी विवाह करणाऱ्या भारतीय महिलांना वैद्यकीय आणि कायदेशीर मदत देण्याच्या मुद्द्यावरून राहुल यांनी उपस्थित केलेला मुद्दा वरूण यांनी उचलून धरला. तर दुसरीकडे राहुल गांधीदेखील वरूण यांच्या अनेक मुद्द्यांवर सहमती दर्शवताना दिसत होते. दोघांमधील हा सुसंवाद उपस्थितांना आश्चर्याचा धक्का होता.
दरम्यान, अनेकदा अपरिपक्व असल्याची टीका होणाऱ्या राहुल गांधींनी शुक्रवारी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची रूग्णालयात जाऊन भेट घेतली आणि राजकीय सौजन्याचे दर्शन घडवले. सुषमा स्वराज यांना छातीत दुखत असल्यामुळे काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राहुल आणि वरूण गांधी एकत्र येतात तेव्हा…
सध्या गांधी परिवारात 'अच्छे दिना'चे वारे वाहत असल्याचे दिसत आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
आणखी वाचा
First published on: 30-04-2016 at 11:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When estranged cousins rahul and varun gandhi sat together in a meeting