मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह उत्तर भारतात अनेक ठिकाणी उन्हाचा चटका वाढला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासह देशात उन्हाची दाहकता कमी झाली आहे. काल महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाच्या सरी देखील कोसळल्या आहे. असं असताना आता भारतीय हवामानशास्त्र विभागानं मान्सूनच्या आगमनाबाबत मोठी बातमी दिली आहे. यंदा अपेक्षेपेक्षा आधीच मान्सून दाखल होईल, असा अंदाज आयएमडीकडून वर्तवण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यंदा अंदमान आणि निकोबार बेटांवर सर्वप्रथम नैऋत्य मोसमी वारे धडकून १५ मे रोजी हंगामातील पहिला पाऊस पडू शकतो, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गुरुवारी दिली. १५ मे २०२२ च्या सुमारास नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात धडकण्याची शक्यता आहे,” असंही हवामान विभागानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

दरवर्षी साधारणत: १ जून रोजी केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल होत असतो. मात्र, यावर्षी नैऋत्य मोसमी पाऊस एक आठवडा आधीच आगमन करण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील वाऱ्यांच्या हालचालीमुळे यंदा केरळमध्ये लवकर मान्सून दाखल होण्यासाठी पोषक हवामान तयार होत असल्याचंही हवामान खात्यानं म्हटलं आहे. याशिवाय येत्या पाच दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटांवर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर मे महिन्याच्या १४ ते १६ मे या कालावधीत अंदमान निकोबार बेटांवर अचानक मुसळधार पाऊस धडकण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान १५ मे आणि १६ मे रोजी दक्षिण अंदमान समुद्रात ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यताही आयएमडीने वर्तवली आहे. तर केरळ-माहे आणि लक्षद्वीप परिसरातही पुढील ५ दिवसांत विजांच्या गडगडाटासह वेगवान वाऱ्यांच्या साथीनं हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When monsoon will arrive in india imd latest update about southwest monsoon rmm