Hathras Stampede Updates : हाथरस येथे भोले बाबांच्या सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबद्दल मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. या अपघातात भारतीय लष्करातील निवृत्त सुभेदार राम नरेश यांचाही मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती देताना त्यांच्या मुलगा मनमोहन कुमार म्हणाले, “लोक मरत असताना बाबा भोले पळून गेले. ते अनेकांचे प्राण वाचवू शकले असते.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनमोहन कुमार हे भारतीय वायूसेनेत अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यालयात त्यांच्या पत्नीने फोन केला. राम नरेश फोन उचलत नसल्याचं त्यांनी फोनवरून मनमोहन कुमार यांना सांगितलं. त्यामुळे मनमोहन कुमार यांनीही त्यांच्या वडिलांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी उचलला नाही. त्यानंतर, काही काळानंतर त्यांना राम नरेश मरण पावले असल्याची माहिती मिळाली.

“माझे वडील स्टेजजवळ बसले होते. जेव्हा गर्दी वाढायला लागली तेव्हा त्यांना कोणीतरी ढकललं. लोक त्यांच्यावरून चालू लागले. माझ्या गावातील एकाने माझ्या वडिलांना ओळखले. त्यांनीच आम्हाला मृत्यूची माहिती दिली”, असं मनमोहन म्हणाले.

ते म्हणाले की, त्यांचे वडील नारायण साकार विश्व हरी उर्फ ​​’भोले बाबा’ यांच्या सत्संगाला त्यांच्या गावात सुमारे चार वर्षांपूर्वी पहिल्यांदा गेले होते. तो काही मोठा सोहळा नव्हता, तो आंब्याच्या मळ्यात आयोजित करण्यात आला होता. त्या दिवशी सत्संगात ते खूप आनंदी दिसत होते. चांगल्या कृतींबद्दल बोलणे खूप सोपे आहे, परंतु ते कृतीत आणणे फार कठीण आहे. बाबा त्यांच्या सत्संगात इतरांना मदत करा म्हणायचे, पण चेंगराचेंगरी झाल्यावर ते पळून गेले. ते लोकांचे प्राण वाचवू शकले असते”, असं मनमोहन यांचा धाकटा भाऊ संदीप म्हणाला. मनमोहन प्रमाणेच संदीप देखील IAF मध्ये आहे.

हेही वाचा >> Hathras Stampede : “गर्दी आणि देणगी जमवण्याकरता…”, अटक केलेल्या सेवेकऱ्यांची पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक माहिती!

संदीपने सांगितले की, त्यांचे आई-वडील दोघेही भोले बाबाचे अनुयायी होते, मात्र त्याची आई राम लक्ष्मी यावेळी सत्संगाला गेली नाही. राम नरेश बाबांचे निस्सीम भक्त कसे बनले याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “ते फार आध्यात्मिक होते. मी त्यांना कधी त्यांच्या श्रद्धेबद्दल कधीच प्रश्न विचारला नाही. माझे वडील म्हणायचे की जे योग्य आहे ते करा, बाकीची काळजी भोले बाबा घेईल.”

मृतांचे शवविच्छेदन अहवालही आला समोर

मुख्य वैद्यकीय अधिकारी अरुण श्रीवास्तव यांनी सांगितलं की, शवविच्छेदन अहवालानुसार छातीच्या पोकळीत रक्त साचल्याने, श्वासोच्छवास आणि बरगडीच्या जखमांमुळे लोकांचा मृत्यू झाला. मथुरा, आग्रा, पिलीभीत, कासगंज आणि अलीगढ येथून २१ मृतदेह एसएन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते. येथे डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केलं. मृतदेह येताच मंगळवारी रात्रीपासून मृतांच्या नातेवाईकांनी शवागरात गर्दी करण्यास सुरुवात केली. शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.”

हेही वाचा >> Hathras Stampede : “मृतांना जिवंत करणार अन् आजारांना पळवणार”, भोले बाबांबाबत अनुयायांनी केलेले दावे चर्चेत!

एफआयआरमध्ये काय?

दोन लाखांहून अधिक नागरिक मंडपात उपस्थित होते. भोलेबाबा दुपारी साडेबारा वाजता घटनास्थळी दाखल झाले. एक तास हा कार्यक्रम सुरू होता. दुपारी १.४० च्या सुमारास बाबा मंडपातून बाहेर येऊन इटावाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाकडे जात होते. त्याच वेळी भाविक त्यांच्या दिशेने पळाले तसेच बाबा जात असलेली जमिनीवरील माती माथ्याला लावण्यासाठी पळापळ करू लागले असे अहवालात नमूद केले आहे. अधिकाधिक नागरिक महाराजांच्या वाहनाच्या दिशेने पळू लागल्यावर परिस्थिती गंभीर झाली. बाबाच्या सुरक्षा रक्षकांनी नागरिकांना मागे ढकलले. त्यामुळे काही नागरिक खाली पडले. खुल्या मैदानात जाण्यासाठी नागरिक धावपळ करू लागले. यातून परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. मैदान निसरडे असल्याने नागरिक घसरून पडले. जे नागरिक पडले ते पुन्हा उठू शकले नाहीत असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When people were dying baba fled family of subedar who died in hathras stampede sgk