राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर सध्या बिहारच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांना सत्ता मिळवून देण्यात किशोर यांचा मोठा वाटा आहे. बिहारमधील सत्ताधारी जनता दल युनायटेड पक्षाच्या मागील निवडणुकीतल्या यशामागे प्रशांत किशोर होते, असं सांगितलं जातं. हेच प्रशांत किशोर आता बिहारच्या राजकारणात सक्रीय झाले आहेत. प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये ‘जनसुराज’ पदयात्रा सुरू केली आहे. या यात्रेमधून ते थेट बिहारमधील मतदारांशी संपर्क साधत आहेत. प्रशांत किशोर हे लवकरच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगितलं जातं. परंतु, त्यांच्या राजकीय पक्षाची स्थापना कधी होणार? ते निवडणूक कधी लढणार? कोणत्या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. यावर स्वतः प्रशांत किशोर यांनी उत्तरं दिली आहेत.
प्रशांत किशोर म्हणाले, आधी बिहारचा समाज बदलासाठी तयार व्हायला हवा. लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक कोण जिंकणार हे महत्त्वाचं नाही. समाज बदलायला हवा. आम्ही २०१५ मध्येच बिहारची निवडणूक जिंकलो होते. परंतु, त्याने बिहारचा समाज बदलला का? बिहार बदललं का? विकास झाला का? या सर्व गोष्टींवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
निवडणूक लढण्याच्या प्रश्नावर प्रशांत किशोर म्हणाले, मी निवडणूक लढणं किंवा न लढणं हा काही महत्त्वाचा विषय नाही. सर्वांना वाटलं तर मी निवडणुकीला उभा राहीन. २०१७-१८ मध्ये मी जदयूमध्ये होतो तेव्हा चर्चा चालू होती की मी आता राज्यसभेवर जाणार आहे. परंतु, तेव्हाही माझं ठरलं होतं की, मी बिहारमध्येच राहणार आहे आणि बिहारसाठीच काम करेन. माझे जनसुराज यात्रेतले सहकारी म्हणाले तर मी नक्की निवडणूक लढवेन.
हे ही वाचा >> Ram Mandir : “मुसलमानांच्या हत्येनंतर…”, प्राणप्रतिष्ठेआधी जैश-ए-मोहम्मदची भारताला धमकी; म्हणाले, “मंदिराची अवस्था…”
प्रशांत किशोर म्हणाले, माझे सहकारी सांगतील त्या मतदारसंघातून मी निवडणूक लढवेन. आररिया, चंपारण, सासाराम बक्सर, पाटणा, राधोपूर, अशा कुठल्याही मतदारसंघातून निवडणूक लढवायला मी तयार आहे. मी कोणाला घाबरत नाही. आम्ही इतर राज्यांमध्ये जाऊन मतदारसंघांची निवड करू शकतो तर हेच काम आमच्या राज्यात आमच्यासाठीच करत असू तर आमच्यासाठी ते किती सोपं असेल? मी ठरवलं तर लगेच मतदारसंघ निवडता येईल. मला बिहारचं इतकं ज्ञान नक्कीच आहे की, मी स्वतःसाठी योग्य मतदारसंघाची निवड करू शकेन. प्रशांत किशोर द लल्लनटॉपच्या जमघट या मुलाखतीच्या कार्यक्रमात बोलत होते.