आपल्या अभिनयाने हिंदी सिनेमामधील एक काळ गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते आणि सध्या भारतीय जनता पक्षाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा हे रविवारी कपिल शर्मा शोमध्ये सहभागी झाले होते. कपिलबरोबर रंगलेल्या गप्पांमध्ये सिन्हा यांनी आपल्या राजकीय जिवानातील अनेक किस्से सांगतिले. यावेळेस नवज्योत सिंग सिद्धूही उपस्थित होते. या दोघांनीही एकाच पक्षात अनेक वर्षे एकत्र काम केले आहे. सिद्धू यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन काही महिने उलटले आहे. तर दुसरीकडे सिन्हा आपल्याच पक्षाच्या धोरणांवर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर सार्वजनिकपणे टिका करताना दिसतात. सिन्हा आणि सिद्धू या दोघांनीही एकमेकांवर स्तुतीसुमने उधळली. यावेळी सिद्धूंनी त्यांच्या स्टाइलमध्ये सिन्हांसाठी एक दोन शेर म्हटले तर दुसरीकडे सिन्हा यांनीही सिद्धू यांना प्रेमळ, वेगळा, शानदार, दमदार अशी विशेषणे लावून त्यांची स्तुती केली. दोन्ही नेत्यांना एका मंचावर उपस्थित असलेले पाहून कार्यक्रमाचा सुत्रसंचालक कपिल शर्मानेही काँग्रेस आणि भाजपाचे नेते उपस्थित असताना एक छोटी निवडणुकही तेथे घेतली.
आपल्या दमदार संवादांसाठी लोकप्रिय असणाऱ्या सिन्हा यांना तुम्ही इतके भारी संवाद कुठून आणता असा प्रश्न कपिलने विचारला. त्यावेळी उत्तर देताना ‘मी जेथे राहत होतो तेथील स्थानिकांच्या गप्पांमधील काही वाक्य मी माझ्या पद्धतीने संवाद बोलताना वापरायचो’, असं सिन्हा यांनी सांगितले. हे उत्तर ऐकल्यानंतर सिन्हा यांनी मलाही ‘जलवा-ए-जुंबिश’ आणि ‘आयातुल्ला खुलखुली’ हे दोन शब्द शिकवले होते असं सिद्धू यांनी सांगितलं. सिद्धूंच्या या आठवणीनंतर सिन्हा यांनी आणखीन एक मजेदार किस्सा या कार्यक्रमात सांगितला.
संसदेमध्ये घडलेला किस्सा सांगताना सिन्हा म्हणाले, ‘संसदेच्या एका चर्चेदरम्यान मी माझं म्हणणं मांडत होतो. माझा मुद्दा मांडून झाल्यावर शेवटचं वाक्य मी म्हणालो की असं झालं नाही तर जलवा-एजुंबिश होईल, आदि-ए-बगावत होईल आणि आयातुल्ला खुलखुली होईल. माझं हे बोलणं ऐकून महिला उपसभापतींनी मला थांबवले. त्यांचा उर्दू भाषेचा चांगला अभ्यास होता. त्यांनी मला विचारले जलवा-एजुंबिश, आदि-ए-बगावत आणि आयातुल्ला खुलखुली म्हणजे काय. त्यावेळी मी त्यांना इतकचं म्हटलं की मॅडम तुम्ही एका सिनेमाचं नाव ऐकलं असेल ‘जानम समजा करो.’
Want to know Shatrughan Ji and Poonam Ji’s secret to a happy married life? Find out tonight on #TheKapilSharmaShow at 9:30 PM! @KapilSharmaK9 @trulyedward @kikusharda @haanjichandan @Krushna_KAS @bharti_lalli @sumona24 @RochelleMRao @shatrugansinha @shatrugansinha pic.twitter.com/jCuX0JHwrX
— Sony TV (@SonyTV) January 13, 2019
सिन्हा यांनी कपिलबरोबर गप्पा मारताना आपल्या लग्नाच्या वेळेचे किस्सेही सांगितले. पाहुणे म्हणून आलेल्या सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम यांनी त्यांची लव्ह स्टोरीच कार्यक्रमामध्ये सांगितले. जेव्हा माझा भाऊ माझ्या लग्नाची बोलणी करण्यासाठी पूनमच्या आईकडे गेला होता त्यावेळी आईंनी माझा चेहरा एखाद्या गुंडासारखा दिसतो असं सांगून स्थळ नाकारलं होतं अशी आठवणही सिन्हा यांनी सांगितली.