देशातील पाच राज्यांत विधानसभा निवडणुकांचा धडाका सुरू आहे. छत्तीसगड, मिझोराम, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि राजस्थान या पाच राज्यांमधील निवडणुकांत काँग्रेस महत्त्वाचा पक्ष आहे, त्यामुळे काँग्रेसच्या प्रत्येक कृतीकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं जातंय. निवडणूक प्रचारांचा धडाका सुरू असतानाच काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय नेते राहुल गांधी थेट उत्तराखंड येथे जाऊन पोहोचले आहेत. रविवारी उत्तराखंड येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी केदारनाथ धाम येथील भक्तांशी संवाद साधून त्यांना चहाचं वाटप केलं. तर, आज (६ नोव्हेंबर) केदारनाथ धाम येथील आदि गुरू शंकाराचार्य यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तराखंड काँग्रेसकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी तीन दिवसीय खासगी दौऱ्यावर आहेत. ५ नोव्हेंबर रोजी त्यांनी केदारनाथ धामचे दर्शन आणि पूजा-अर्चा केली. त्यांनी महादेवाकडे संपूर्ण देशाच्या शांती, सुख आणि समृद्धीची प्रार्थना केली. हा खासगी दौरा असल्याने या काळात कोणत्याही राजकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले नाही, असंही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राहुल गांधी यांनी रविवारी केदारनाथ धाम येथील भाविकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. तसंच, त्यांना चहाचंही वाटप केलं. चहावाटपाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर, आज आदि गुरू शंकाराचार्य यांच्या समाधी स्थळाचं दर्शन घेतलं. तसंच, तेथील उपस्थित भविकांना स्वहस्ते प्रसाद वाटप केले.

दरम्यान, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील प्रचारात राहुल गांधी हे स्टार प्रचारक आहेत. सोनिया गांधी यांची सक्रियता कमी झाल्याने आता राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यावरच प्रचाराचा भार आहे. प्रियांका गांधी मध्य प्रदेशात सर्वाधिक प्रचार करत आहेत. तर, राहुल गांधी यांनी तेलंगणाकडे लक्ष दिलं आहे. छत्तीसगड आणि राजस्थानात दोघांनीही प्रचार सभा घेतल्या. त्यामुळे उत्तराखंडचा दौरा संपल्यावर राहुल गांधी पुन्हा एकदा प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होतील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When the elections are raging in five states rahul gandhi distributed prasad with his own hands after tea in kedarnath dham sgk