महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशनात अभिनेता आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राजकारण, समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला, या आणि अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी उपस्थितांच्या मनातील एक प्रश्नही राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्या प्रश्नावर राज ठाकरे यांनी त्यांच्या खुमासदार शैली मिश्किल उत्तर दिलं. हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
राज ठाकरेंची ही मुलाखत चांगली तासभर चालली. तासभराच्या या मुलाखतीत राज ठाकरे यांना विविध विषयांवर बोलतं केलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी उपस्थितांच्या मनातील एक प्रश्न विचारला. त्या म्हणाल्या, “सर्वांच्या वतीने मी तुम्हाला हा प्रश्न विचारण्याची हिंमत करतेय. राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याची बातमी केव्हा मिळणार?”, असा प्रश्न विचारताच राज ठाकरेही हसू लागले. तेवढ्यात ते म्हणाले, “मुख्यमंत्री झाल्या झाल्या याची बातमी कळणार.” ते पुढे म्हणाले, “हे काय मॅटर्निटी होम नाहीय. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्या झाल्या याची बातमी मिळणार”, असं राज ठाकरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकींच्या निकालांकडे कसं पाहता?
आता निकाल लागला आहे. यातून बोध कोणी पुढे काही होतंय का हे पाहणं गरजेचं आहे. उद्या कोणी इथून तिथे जातील, तिथून इथे येतील, काही सांगता येणार नाही. त्यामुळे वर्षभरानंतर पाहू काय होतंय नक्की. ज्याप्रकारे निकाल लागला आहे, त्यानुसार प्रत्येकाला जमिनीवर आणलं आहे.
“या पक्षाचं नाव फार विचार करून ठेवलं गेलं. जे आहे त्यावेळेला ते नको होतं म्हणून हे नवनिर्माण करायचं होतं?”, असा प्रश्न विचारल्यावर राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्राकडे बघण्याचा तरुण-तरुणांचा, लोकांचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, असं माझं मत होतं. २०१४ ला मी डॉक्युमेंटरी केली होती. मला महाराष्ट्र कसा दिसतो. माझं माझ्या देशावर प्रेम आहे, म्हणजे काय? बॉर्डरवर जाणार आहेस का? गोळीबार करणार आहे? म्हणजे आपण काय करणार आहोत. मला असं वाटतं की माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर जरी मी स्वतः स्वच्छ ठेवला हा प्रत्येकाने विचार केला तरी देश स्वच्छ होईल. आज तुम्ही अमेरिकेत फिरता, युरोपमध्ये फिरता त्यावेळी असं वाटतं की त्यांचं त्यांच्या देशावर प्रेम आहे, कारण ते स्वच्छता ठेवतात. सॅनफ्रॅन्सिस्कोला जाऊन आलो. किती उत्तम शहर आहे. वेल डिजाईन शहर आहे. आज तुम्ही हिरोशिमा आणि नागासकीला गेला तर तुम्हाला विश्वास नाही बसणार की इथं कोणी अणुबॉम्ब टाकले होते. मग आपली शहरं काही कारण नसताना बॉम्ब टाकल्यासारखी का वाटतात. याचं कारण, स्वतःचं समजणं ही गोष्ट समजली जात नाही.”
सविस्तर बातमी अपडेट होत आहे