Amit Shah in Chhattisgarh: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या दंतेवाडा जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी आदिवासी जमातीच्या बस्तर पंडुम या उत्सवात सहभागी होत आदिवासींना शुभेच्छा दिल्या. “नक्षलवादी हे आमचे बांधव आहेत. त्यांनी शस्त्र सोडून द्यावे आणि मुख्यप्रवाहात सामील व्हावे, असे मी त्यांना कळकळीची आवाहन करतो”, असेही अमित शाह यावेळी म्हणाले. संपूर्ण देश आणि बस्तर येथील डाव्या विचारांच्या कट्टरपंथीयांचा (LWE) नायनाट करण्यासाठी २६ मार्चची मुदत दिली होती, असेही त्यांनी पुन्हा एकदा सांगितले.

“बस्तरमध्ये एकेकाळी गोळीबार आणि स्फोट होत होते, तो काळ आता गेला. आज शस्त्र असलेल्या आणि नसलेल्या अशा सर्वच नक्षलवाद्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी शस्त्र सोडून मुख्य प्रवाहात यावे. तुम्हीही आमच्यापैकी एक आहात. जेव्हा जेव्हा नक्षलवादी मारला जातो, तेव्हा आम्हाला आनंद होत नाही. कुणालाच होत नाही. या भागाला विकास हवा आहे. मागच्या ५० वर्षात या भागाला जे मिळाले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ वर्षांत देऊ केले. पण बस्तरमध्ये शांतता नांदली तरच हे शक्य होणार आहे”, असे प्रतिपादन अमित शाह यांनी केले.

अमित शाह पुढे म्हणाले, “बस्तरमधील मुले शाळेत जातील, इथल्या मातांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल. आदिवासी मुलांमध्ये कुपोषणाची समस्या उरणार नाही. शिक्षण, आरोग्य अशा सुविधा गावात उपलब्ध होतील. तालुका पातळीवर रुग्णालय उभारता येईल. तसेच प्रत्येक कुटुंबाला प्रति महिना सात किलो तांदूळ, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि आरोग्य विमा दिला जाईल. हे तेव्हाच होऊ शकते, जेव्हा बस्तर नक्षलमुक्त होईल.”

त्या गावांना एक कोटी रुपये मिळणार

नक्षलमुक्त अभियानाची माहिती देताना अमित शाह म्हणाले की, जे जे गाव स्वतःला नक्षलमुक्त असल्याचे घोषित करतील त्या गावांच्या विकासासाठी एक कोटींचा निधी दिला जाईल. त्यामुळे तुमच्या गावातील नक्षलवाद्यांना आता आत्मसमर्पण करण्यास सांगा, असे आवाहन अमित शाह यांनी केले.

ज्या नक्षलवाद्यांनी शस्त्र टाकले (आत्मसमर्पण) त्यांना विकासाचा अर्थ कळला आहे. आज आपल्या बंदूक नको तर संगणक हवे आहेत. बॉम्ब नको तर पेन हवा आहे. २०२५ च्या पहिल्या तीन महिन्यात ५२१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तर मागच्या वर्षी ८८१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, अशी माहितीही त्यांनी दिली.