माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप
भारतीय जनता पक्ष सत्तेत आला की देशात दहशतवादी हल्ले वाढतात, असे वादग्रस्त विधान करून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी खळबळ उडवली आहे. विमान अपहरण, कारगिल युद्ध, संसदेवर हल्ला झाला तेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेत होता. आतादेखील मोदी सत्तेत आल्यापासून दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे, अशी टीका शिंदे यांनी केली.
कोणत्याही कारणासाठी संसद ठप्प करून पंतप्रधानांचा राजीनामा मागणारा भाजप आता सत्तेत आहे. त्यामुळे पठाणकोटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी निश्चित करून संबंधित पदावरील व्यक्तींनी राजीनामे द्यावे, अशी मागणी शिंदे यांनी केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह व संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यापैकी कुणाचेही नाव घेण्याचे शिंदे यांनी टाळले.
कुणालाही सूचना न देता पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांची भेट घेणाऱ्या मोदींनी त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील देशवासीयांना द्यावा, अशी मागणी शिंदे यांनी केली. ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दावरून भारतीय जनता पक्षाने केलेल्या टीकेला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, गृहमंत्री असताना मी पक्षाच्या व्यासपीठावरून हा शब्द वापरला होता. त्यामागे धार्मिक भावना नव्हती. कारण दहशतवादाला धर्म नसतो. संसदेत वा सरकारच्या व्यासपीठावर मी याबाबत बोललो नव्हतो. तरीही भाजपने त्यावर आक्षेप घेत संसद ठप्प केली होती.
काय म्हणाले शिंदे?
· मोदींच्या १९ महिन्यांच्या काळात भारत-पाकिस्तान सीमेवर ९०० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले. त्यात १९ जवान व ३४ नागरिकांनी प्राण गमावले.
· सीमा सुरक्षा दलानुसार गेल्या वर्षभराच्या काळात पाकिस्तानातून घुसखोरी करणाऱ्या घटनांमध्ये वाढ.
· गेल्या सहा महिन्यांमध्ये भारतात तीन मोठे दहशतवादी हल्ले झाले आहेत. पंजाबमध्ये दोन तर जम्मू-काश्मीरमध्ये एक हल्ला झाला.
· मोदी यांनी पाकिस्तानला भेट दिल्यानंतर केवळ सहा दिवसांनी पठाणकोट हवाई तळावर हल्ला झाला.

Story img Loader