माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या इच्छेविरुद्ध प्रणब मुखर्जी यांनी १९८०ची लोकसभा निवडणूक लढविली होती आणि त्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याने इंदिरा गांधी यांनी प्रणब मुखर्जी यांची अनेकदा चांगलीच खरडपट्टी काढली होती. मात्र निवडणुकीत पराभव पत्करावा लागूनही त्या वेळी मुखर्जी यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली होती.
राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे ‘द ड्रामॅटिक डिकेड : दी इंदिरा गांधी ईयर्स’ हे पुस्तक अलीकडेच रूपा प्रकाशनने प्रकाशित केले असून त्यामध्ये स्वत: मुखर्जी यांनीच हा गौप्यस्फोट केला आहे. इंदिरा गांधी १९८० मध्ये पुन्हा सत्तेवर आल्या तेव्हाच्या सर्व स्मृतींना मुखर्जी यांनी उजळा दिला आहे.
इंदिरा गांधी यांचा प्रणब मुखर्जी यांच्यावर इतका विश्वास होता, की त्यांनी मुखर्जी यांची केवळ मंत्रिमंडळातच वर्णी लावली नाही तर अन्य ज्येष्ठ नेत्यांना डावलून त्यांच्याकडे राज्यसभेतील सभागृह नेतेपदही बहाल केले होते. ज्येष्ठ नेते भागवत झा आझाद यांनी शपथ घेण्यास नकार दिल्याने ज्योतिषशास्त्रानुसार मंत्रिमंडळाची २२ ही शुभसंख्या ठेवण्यासाठी इंदिरा गांधी यांनी मुखर्जी यांचा मंत्रिमंडळात समावेश केला, ही सुपिक कल्पनेतून आलेली अफवा असल्याचे प्रणब मुखर्जी यांनी म्हटले आहे.
इंदिरा गांधी यांनी १९८० मध्ये नेहमीच्या आत्मविश्वासाने जोरदार मुसंडी मारली. पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या उमेदवारांची निवड करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपविण्यात आली होती आणि त्यांनी सरकारचा कारभार चालविण्याची क्षमता असलेल्या लोकांची निवड करण्याचा सल्ला आपल्याला दिला होता. निवडणुकीत आपल्याला यश मिळणारच, इतका त्यांच्यात आत्मविश्वास होता, असेही मुखर्जी यांनी म्हटले आहे.
निवडणुकीचे निकाल जाहीर झाले तेव्हाच आपली पत्नी गीता दिल्लीकडे रवाना झाली होती. इंदिरा गांधी यांना आपल्याला भेटावयाचे आहे, असा गीता यांनी त्याच दिवशी दूरध्वनी केला आणि आपण तातडीने दिल्लीला रवाना झालो. निवडणूक लढविण्याच्या आपल्या आग्रहामुळे इंदिरा गांधी नाराज झाल्या होत्या ते स्पष्ट दिसत होते. निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्याचे वृत्त कळल्यापासून इंदिरा गांधी नाराज असल्याचे आपल्याला संजय गांधी यांनी सांगितले.
त्यानंतर इंदिरा गांधी यांनी आपली चांगलीच खरडपट्टी काढली. इंदिरा गांधी यांचा राग शांत होईपर्यंत आपण तेथेच होतो. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी आपल्याला फळांनी भरलेली टोपली दिली आणि त्यानंतर आपण तेथून गेलो. माध्यमांनी मंत्रिमंडळातील संभाव्य चेहऱ्यांच्या नावांची यादीही दिली होती, मात्र पराभूत झाल्याने साहजिकच त्यामध्ये आपले नाव नव्हते. मात्र संजय गांधी यांनी आपल्याला मंत्रिमंडळात वाणिज्य खात्याचे कॅबिनेट मंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले.

Story img Loader