कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसने भाजपावर ४० टक्के कमिशनचा आरोप लावल्यानंतर भाजपाने आता राजस्थानात काँग्रेसवर ८५ टक्के कमिशनचा आरोप लावला आहे. “गेल्या नऊ वर्षांत भाजप सरकार नसते तर अनेक केंद्रीय योजना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला आणखी दशके लागली असती”, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. राजस्थानच्या अजमेरमध्ये भाजपा सरकारची नऊ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित सभेला संबोधित करताना त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.
“अनेकजण विचारतात की, देशात जी विकासाची मोठ-मोठी कामं सुरू आहेत, त्यासाठी मोदी एवढे पैस आणतात कुठून? चारही दिशांना विकासाची कामं सुरू आहेत, एवढे पैसे येतात कुठून? मी सांगतो पैसे कुठून आणतो. पूर्वी पैसे कुठे जात होते? आणि आता कुठे जातात, तेही सांगतो. आमच्या देशात विकासाच्या कामासाठी पैशांची कमतरता नव्हती. सरकार पैसे देईल ते पूर्णपणे विकासाच्या कामाला खर्ची होणे गरजेचं असतं. काँग्रेसच्या कार्यकाळात देशाचं रक्त पिणारी व्यवस्था निर्माण झाली होती. देशाच्या विकासाला खाऊन टाकलं जात होतं. काँग्रेसेचे नेते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की, काँग्रेसने १ रुपया पाठलला तर त्यातील ७५ पैसे भ्रष्टाचारात जातात. गेल्या ९ वर्षात भाजपा सरकारमुळे देशाचा विकास शक्य झाला, कारण भाजपाने काँग्रेसचा लुटीचा मार्ग बंद केला आहे”, असं मोदी म्हणाले.
“गेल्या नऊ वर्षांत भाजपा सरकारने केवळ महामार्ग आणि रेल्वेवर २४ लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. राजीव गांधींच्या म्हणण्यानुसार काँग्रेसचे सरकार असते तर २४ लाख कोटींपैकी २० लाख कोटींची लूट झाली असती”, असे ते म्हणाले.
“थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत २९ लाख कोटींपैकी २४ लाख कोटी रुपये; आदिवासी विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी २२ हजार कोटींपैकी २९ हजार कोटी रुपये; पाणी सुविधांसाठी ३.७५ लाख कोटींपैकी ३.१५ लाख कोटी रुपये; आणि गरिबांसाठीच्या घरांसाठी २.२५ लाख कोटींपैकी २ लाख कोटी रुपये मधल्या काळात लुटले गेले असते”, असा आरोपही मोदींनी केला. तसंच, “काँग्रेस लुटताना भेदभाव करत नाही”, असंही मोदी म्हणाले.
काँग्रेसने कोट्यवधी स्त्रिया आणि लहान मुलांचे जीवन धोक्यात आणल्याचा आरोपही मोदींनी यावेळी केला. ते म्हणाले की, “काँग्रेसच्या राजवटीत लसीकरण कव्हरेज सुमारे ६० टक्के होते. काँग्रेसला शंभर टक्के कव्हरेज गाठण्यासाठी आणखी ४० वर्षे लागली असती, यामुळे गरीब महिला आणि मुलांचे जीव गेले असते”, असंही मोदी म्हणाले.