पीटीआय, नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रोजगाराशी संबंधित ‘ईएलआय’ योजनेवरून टीका केली. हा एक ‘जुमला’ असल्याचा आरोप करतानाच गाजावाजा करीत केलेली दहा हजार कोटी रुपयांची ही योजना कुठे गायब झाली, असा प्रश्नही केला.
२०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देत पंतप्रधान मोदींनी ‘एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह’ (ईएलआय) योजना धूमधडाक्यात जाहीर केली होती. ही योजना जाहीर होऊन जवळपास एक वर्ष झाले आहे, परंतु सरकारने त्याची व्याख्याही केलेली नाही असे राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर सांगितले.
सूक्ष्म आणि लघु उद्याोगक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, निष्पक्ष बाजार, स्थानीक उत्पादनांचे जाळे विणल्यास रोजगार निर्मिती होऊशकते, असे ते म्हणाले.
दरम्यान,काँग्रेस नेते अज्ञानाला शस्त्र बनवीत असल्याचे प्रत्युत्तर भाजपने राहुल गांधी यांना दिले.
बेरोजगारीबाबत पंतप्रधान मोदी किती गंभीर आहेत? भारताला नितांत गरज असलेल्या लाखो नोकऱ्या निर्माण करण्यासाठी तुमची ठोस योजना काय आहे की हा आणखी एक जुमला आहे? दररोज तुम्ही नवी घोषणा करता आणि तरुणमात्र संधीच्या शोधात आहेत. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते, लोकसभा
मोदी सरकारने योजनांतून अर्थपूर्ण निकाल दिले आहेत, तर काँग्रेसचा वारसा पोकळ घोषणा आणि तोडलेली आश्वासने असा राहिला आहे. तुमचे सरकार युवकांना भविष्य देण्यात का अपयशी ठरले याचा विचार करा. भारतीय तरुण निकाल देणारे सरकार आणि फसवणूक करणारी घराणेशाही यातील फरक जाणतात. – अमित मालवीय, माध्यम प्रमुख, भाजप