फालीन चक्रीवादळाने ओदिशाला तडाखा दिला, त्या वेळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि गुजरातचे मुख्यमंत्री कोठे होते, या शब्दांत ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी बुधवारी या तिघांवर येथे टीकेची तोफ डागली.
फालीन चक्रीवादळ आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे येथील असंख्य लोकांच्या हालांना पारावार उरलेला नव्हता. तेव्हा हे सर्व जण कोठे होते. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह हेही त्या वेळी येथे आले नाहीत, असे पटनाईक म्हणाले. गंजम जिल्हय़ामध्ये आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. गंजम जिल्ह्य़ास चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला होता. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर पटनाईक यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. हिमालयाच्या परिसरातील उत्तराखंडाला नैसर्गिक आपत्तीची झळ बसली तेव्हा सोनिया, राहुल आणि मोदी या तिघांनी तेथे धाव घेतली परंतु ओदिशामध्ये मात्र आपत्तीच्या काळात त्यांना यावेसे वाटले नाही, याकडे पटनाईक यांनी लक्ष वेधले. जगन्नाथाच्या भूमीवरील जनता अत्यंत भयावह अशा नैसर्गिक आपत्तीचा सोमना करीत होती, तेव्हा आता जगन्नाथाच्या नावाने लोकांकडे मते मागणारे नेते त्या वेळी कोठे होते, अशी विचारणा पटनाईक यांनी अलीकडेच झालेल्या मोदी यांच्या जाहीर सभेच्या संदर्भात केली.
केंद्र सरकारला खाणमालकांचे भरते आले असून या ‘प्रेमा’ पोटी राज्य सरकारला दर वर्षी १,८०० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे, असा आरोप त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा