अरुणाचल प्रदेश आणि लडाख सीमा भागात चीन युद्धाची तयारी करीत आहे, तर नरेंद्र मोदी यांचे सरकार निद्राधीन राहून संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करीत आहे. चीनने २००० किलोमीटर भारतीय भूभाग ताब्यात घेतला आहे. त्याचबरोबर २० जवानांचाही बळी घेतला आहे. शिवाय, हल्लीच अरुणाचल प्रदेशात आपल्या जवानांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीकास्त्र डागलं होतं.
राहुल गांधींना आता केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तवांगवर आम्हाला प्रश्न विचारण्यापूर्वी राहुल गांधींनी उत्तर दिलं पाहिजं, डोकलाममध्ये भारतीय सैन्य चिनी सैन्याशी लढत होता. तेव्हा तुम्ही चिनी अधिकाऱ्यांबरोबर होता का?, राहुलजी उत्तर द्या. तुम्ही चिनी लोकांबरोबर काय करत होता. राहुल गांधी गप्प का आहेत? ते फक्त आमच्या सैन्यावर प्रश्न उपस्थित करतात,” अशी टीका अनुराग ठाकूर यांनी केली आहे.
“मोदी सरकार काहीही…”
“चीनचा वाढता धोका मला अगदी स्पष्टपणे दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मी त्याकडे लक्ष वेधत आहे, पण सरकार मात्र दुर्लक्ष करून सत्य लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. चीनच्या धोक्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही वा तो लपवलाही जाऊ शकत नाही. मोदी सरकार काहीही ऐकून घेण्यास तयार नाही,’’ असं राहुल गांधींनी म्हटलं होतं.
हेही वाचा : ‘वंदे मातरम’च्या या सादरीकरणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले कौतुक; पाहा त्यांनी शेअर केलेला Video
“सत्य स्वीकारणे जड जाते”
“चीनची जोरदार तयारी सुरू आहे आणि ती युद्धासाठीच आहे, घुसखोरीसाठी नाही. त्यांच्या शस्त्रांचे स्वरूप आणि हालचाली पाहिल्या तर सर्व काही लक्षात येईल. पण, मोदी सरकार हे लपवण्याचा प्रयत्न करीत आहे. कारण सत्य स्वीकारणे त्याला जड जाते,” अशी टीका राहुल यांनी केली.