Unemployment Rate In India: करोना नंतर देशासमोर उभ्या थकलेल्या अनेक समस्यांपैकी एक म्हणजे बेरोजगारी. करोनाचा जोर ओसरून अजूनही देशात रोजगाराची स्थिती सुधारलेली दिसत नाही. ‘सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकोनॉमी’ने (सीएमआयई) ने गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये देशात बेरोजगारी दर ८ टक्के नोंदविण्यात आला आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत देशातील बेरोजगारीच्या ७.७७ टक्क्यांच्या तुलनेत आणखी वाढ झाली आहे. मागील तीन महिन्यातील आकडेवारी पाहता बेरोजगारीच्या देशाने उच्चांक गाठला आहे.
देशातील प्रमुख शहरात परिस्थिती बिकट
‘सेंटर फॉर मॉनिटिरग इंडियन इकोनॉमी’ने (सीएमआयई) ही आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार शहरी भागात बेरोजगारी अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरांमध्ये बेरोजगारीचा दर ८.९६ टक्के, तर ग्रामीण भागात ७.५५ टक्के आहे. ऑक्टोबरमध्ये हा दर अनुक्रमे ८.०४ टक्के आणि ७.२१ टक्के होता.
सर्वाधिक व सर्वात कमी बेरोजगारी असणारी राज्ये
हरियाणा राज्यात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक ३०.६ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे तर टॉप ५ राज्यांमध्ये णजेच राजस्थान (२४.५ टक्के), जम्मू-काश्मीर (२३.९ टक्के), बिहार (१७.३ टक्के) आणि त्रिपुरा (१४.५ टक्के) ही सर्वात खराब कामगिरी करणारी राज्ये ठरली आहेत. यापाठोपाठ मेघालय (२.१ टक्के), कर्नाटक (१.८ टक्के), ओडिशा (१.६ टक्के), उत्तराखंड (१.२ टक्के) तर सर्वात कमी बेरोजगारीचा आकडा हा छत्तीसगढ (०.१ टक्का) मध्ये पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्राची आकडेवारी काय सांगते?
सीएमआयईच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा बेरोजगारी दर नोव्हेंबरमध्ये ३.५ टक्के नोंदवण्यात आला आहे. याआधीच्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात अनुक्रमे ४ टक्के आणि ४.२ टक्के बेरोजगारीचा दर होता. राज्याच्या शहरी भागांमध्ये बेरोजगारी दर ४.८ टक्के आणि ग्रामीण भागात २.८ टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हे ही वाचा<< विश्लेषण: 5G मुळे प्रवासी विमानांच्या उड्डाणांमध्ये अडथळे येतात? विमानतळ क्षेत्रात केंद्रीय मंत्रालय काय बदल करणार?
दरम्यान, मागील वर्षभरातील आकडेवारी पाहायला गेल्यास ऑगस्ट २०२२ मध्येदेशातील बेरोजगारीची टक्केवारी यंदाची सर्वाधिक म्हणजेच ८. २८ इतकी नोंदवण्यात आली होती मात्र मागील दोंन महिन्यापासून हा टक्का खाली आला होता. मात्र नोव्हेंबर महिन्यात पुन्हा एकदा बेरोजगारीच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.