विरोधकांनी एका फर्मच्या अहवालावर लक्ष केंद्रीत करून त्याला महत्त्व दिलं. या फर्मची पार्श्वभूमी कुणालाही माहित नाही. त्यांचं नाव आम्ही कधीही ऐकलं नाही. या प्रकरणी एका औद्योगिक समूहाला टार्गेट करण्यात आलं. असं वक्तव्य करत शरद पवार यांनी अदाणी हिडेंनबर्ग प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. मोदी आणि अदाणी यांची मिलिभगत आहे असे आरोप राहुल गांधी यांनी केले. तसंच मोदी आणि अदाणी यांचे फोटोही संसदेत दाखवले होते. त्यानंतर संसदेत एकच गदारोळ झाला. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. राहुल गांधींचं निलंबनही झालं. अशात आता शरद पवार यांनी थेट हिंडेनबर्ग हे नावही कधी ऐकलं नाही असं म्हणत राहुल गांधींचे कान टोचले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हटलं आहे अदाणी समूहाविषयी शरद पवार यांनी?

काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी अदाणी समूहाबाबत जी भूमिका घेतली त्यावर शरद पवारांनी महत्त्वाचं भाष्य केलं. शरद पवार म्हणाले, “तुम्ही ज्या कुणावर टीका करत असाल, टार्गेट करत असाल त्यांनी जर चुकीच्या पद्धतीने अधिकार वापरले असतील तर त्यांच्या विरोधात बोलण्याचा अधिकार तुम्हाला लोकशाहीने दिला आहे हे १०० टक्के मान्य आहे. पण काहीही अर्थ नसताना उगाचच हल्ला करायचा, हे मला समजू शकत नाही. पेट्रोकेमिकल क्षेत्रात अंबानी यांनी मोठं योगदान दिलं आहे देशाला त्याची गरज नाही का? वीज क्षेत्रात अदाणी यांचं मोठं योगदान आहे देशाला वीज लागणार नाही का? देशाच्या गरजा लक्षात घेऊन देशाचं नाव त्या क्षेत्रात उंचावणारे हे लोक आहेत” असं म्हणत शरद पवारांनी राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांचे कान टोचले आहेत.

संसदीय समिती नेमायला हवी होती का?

या प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती नेमावी, अशी विरोधकांची मागणी होती. मात्र संयुक्त संसदीय समितीने हा मुद्दा सुटणारा नाही हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण ही समिती नेमली तरीही त्याची देखरेख सत्ताधारी पक्षाकडेच असते. जी मागणी विरोधक करत होते ती सत्ताधारी पक्षाच्या विरोधातली होती. प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमण्यात समितीत आलेल्या सत्ताधारी पक्षाचं बहुमत असेल तर सत्य कसं काय बाहेर येईल? असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला आहे.

“हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आलं”

“हिंडेनबर्ग अहवालात अदाणींना लक्ष्य करण्यात आलं असं दिसतं. या प्रकरणाच्या तपासात स्वतः सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेतला. त्यांनी समिती नियुक्त केली. त्या समितीत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, जाणकार, तज्ज्ञ अशा लोकांचा समावेश आहे. त्यांना मार्गदर्शक सूचना आणि वेळ देण्यात आला. तसेच याचा तपास करून अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं. त्यामुळे शरद पवार यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्यामुळे काँग्रेसने केलेलं आंदोलन आणि गदारोळ यावरच त्यांनी एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आता या सगळ्यावर काँग्रेस नेत्यांची आणि राहुल गांधींची काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: While accusing the gautam adani the opposition only a report of a company was given importance sharad pawar comment on rahul gandhi and congress scj