एकीकडे जागतिक अर्थव्यवस्था अनिश्चिततेच्या स्थितीतून मार्गक्रमण करत असताना भारतीय अर्थव्यवस्थेने कमालीची लवचिकता दाखविली असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. ते सोमवारी नवी दिल्लीत पेट्रोटेक कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. यावेळी मोदी यांनी भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्यातील वाटचालीविषयी भाष्य केले. सध्याच्या घडीला भारतीय अर्थव्यवस्थेतील परकीय गुंतवणूक सर्वोच्च पातळीवर आहे. याशिवाय, हळूहळू आर्थिक वित्तीय तूट कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भविष्यात उत्पादन, वाहतूक, नागरी उड्डाण आणि अन्य क्षेत्रांमध्ये भारतीय अर्थव्यवस्था जोमाने प्रगती करेल. २०४० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार पाचपटीने वाढेल, असा विश्वासही यावेळी मोदी यांनी व्यक्त केला. भारताला उर्जेची गरज असून ती गरिबांपर्यंत पोहचली पाहिजे. त्यासाठी उर्जेच्या कार्यक्षम वापराची गरज आहे. शाश्वत उर्जा ही माझ्यासाठी पवित्र कार्याप्रमाणे आहे. हे उद्दिष्ट सक्तीने नव्हे तर निष्ठेतून साध्य झाले पाहिजे. त्यासाठी आपल्याला आयातीवरील परावलंबित्व कमी करण्याची गरज असून देशांतर्गत तेल आणि नैसर्गिक वायूच्या उत्पादनला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मार्च २०१८ पर्यंत प्रत्येक घरात वीज पुरवठा करण्याचा मानसही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा