White House Blunder : व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी एक मोठी चूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येमेनमधील हुथी बंडखोरांविरोधात हवाई हल्ल्याची योजना आखणे व त्याविषयीची चर्चा करण्यासाठी सिग्नल (एनक्रिप्टेड इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप) ग्रुप बनवला होता. या ग्रुपच्या अ‍ॅडमिनने चॅटमध्ये चुकून एका पत्रकाराला अ‍ॅड केल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती लीक झाली आहे. या वृत्तामुळे अमेरिकेत मोठी खळबळ उडाली आहे.

व्हाइट हाऊसमधील एका अधिकाऱ्याने ‘द अ‍ॅटलांटिक’ मासिकाचे मुख्य संपादक जेफ्री गोल्डबर्ग यांना चुकून एन्क्रिप्टेड सिग्नल ग्रुपमध्ये अ‍ॅड केलं होतं. या ग्रुपमध्ये अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ, अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स आणि इतर वरिष्ठ अधिकारी होते. येमेनमधील हुथी बंडखोरांवर हवाई हल्ला करण्याच्या योजनेवर या ग्रुपमध्ये चर्चा करण्यात आली. येमेनमधील हवाई कारवाईच्या काही तास आधी हा ग्रुप बनवण्यात आला होता.

गोल्डबर्ग यांनी ग्रुपमधून मिळालेली माहिती प्रसिद्ध केली

दरम्यान, गोल्डबर्ग यांनी या संधीचा (व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांच्या चुकीचा) फायदा घेत येमेनमधील हवाई कारवाईचा तपशील त्यांच्या लेखातून प्रसिद्ध केला. गोल्डबर्ग यांचा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांना त्यांची चूक उमगली. ही घटना अनावधानाने घडल्याचं स्पष्टीकरण व्हाइट हाउसने दिलं आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी १५ मार्च रोजी येमेनमधील हुथी बंडखोरांना निर्वाणीचा इशारा दिला होता. तसेच हल्ल्याची घोषणा केली होती. मात्र या हल्ल्यानंतर गोल्डबर्ग यांनी त्यांच्या लेखात म्हटलं आहे की त्यांना या हल्ल्याची आगाऊ सूचना सिग्नलवरील ग्रुप चॅटद्वारे काही तास आधीच मिळाली होती.

व्हाइट हाऊसने दिलं स्पष्टीकरण

व्हाइट हाऊसने २४ मार्च रोजी या घटनेची पुष्टी केली आहे. तसेच यावर स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे त्यांच्या एका अधिकाऱ्याने अतिसंवेदनशील अशा सिग्नल ग्रुपमध्ये एक चुकीचा नंबर अ‍ॅड केला. हा नंबर गोल्डबर्ग यांचा होता. या चॅटमध्ये हल्ल्याची वेळ, उद्दिष्ट्ये, रणनितीविषयी सगळी संवेदनशील माहिती होती. हल्ला करण्यापूर्वीच सर्व माहिती पत्रकाराच्या हाती लागल्याने सुरक्षा प्रोटोकॉलच्या उल्लंघनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, व्हाइट हाऊस या प्रकरणाची चौकशी करत आहे. व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे की “ही एक मानवी चूक आहे. ही चूक का झाली याची आम्हाला कल्पना आहे. अशी चूक पुन्हा होऊ नये यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत.” या घटनेमुळे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या अंतर्गत संवादाच्या, निर्णयांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

संरक्षण सचिव काय म्हणाले?

दुसऱ्या बाजूला संरक्षण सचिव पीट हेगसेथ याबाबत म्हणाले की “युद्धासंबंधीची कोणतीही योजना जाणीवपूर्वक उघड केली गेली नाही. ही एक तांत्रिक चूक होती. कोणीही त्याचे वेगळे अर्थ काढू नयेत.” व्हाइट हाऊस व संरक्षण सचिवांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी ट्रम्प प्रशासनाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.

अध्यक्ष ट्रम्प संपूर्ण घटनेबाबत अनभिज्ञ

राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते ब्रायन ह्युजेस म्हणाले, “गोल्डबर्ग यांच्या अहवालातील माहिती खरी आहे. ते ग्रुपमध्ये कसे काय जोडले गेले याचा आम्ही तपास करत आहोत.” दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “मला या प्रकरणाबद्दल काहीही माहिती नाही. माझा माझ्या राष्ट्रीय सुरक्षा पथकावर पूर्ण विश्वास आहे.”

दरम्यान, गोल्डबर्ग यांनी हल्ल्याची माहिती आधीच प्रसिद्ध केली असती तर त्यांचा लेख अमेरिकेला खूपच महागात पडला असता. मात्र, माहिती हातात असूनही त्यांनी हल्ल्यापूर्वी लेख प्रसिद्ध केला नाही. त्यांनी हल्ल्यानंतरही सर्व माहिती जाहीर केली.