वॉशिंग्टन : ‘हमास’चे कंबरडे मोडण्यासाठी उत्तर गाझामध्ये सुरू असलेले हल्ले मानवतावादी दृष्टिकोनातून दररोज चार तास थांबवण्याचे इस्रायलने मान्य केले आहे, असा दावा अमेरिकेने गुरुवारी केला.
युद्धग्रस्त भागांतून नागरिकांना बाहेर पडता यावे, यासाठी दुसरा सुरक्षित मार्ग तयार करण्यात आला आहे, अशी पुस्तीही अमेरिकेने जोडली. अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी काऊन्सिलचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, प्रथम मानवतावादी दृष्टिकोनातून उत्तर गाझावरील हल्ले चार तास थांबवण्याचे आणि त्याबाबत किमान तीन तास आधी तशी घोषणा करण्याचे वचन इस्रायलने दिले आहे.
हेही वाचा >>> इस्रायलकडून हमासच्या मिसाईल मॅनचा खात्मा
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांच्याशी सोमवारी चर्चा केली होती. त्यावेळी उत्तर गाझामधील हल्ले तीन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी थांबवण्याची सूचना त्यांनी नेतान्याहू यांना केली होती.
इस्रायलने तीन दिवसांपेक्षा अधिक कालावधी युद्धविराम घ्यावा, असे आवाहन आपण केले होते, असे बायडेन यांनी म्हटले होते.
हमासच्या चौकीवर इस्रायलचा ताबा
तेल अवीव : गाझातील जबालिया येथे दहा तासांच्या लढाईनंतर इस्रायलने गुरुवारी सकाळी ‘हमास’ची एक चौकी ताब्यात घेतली. संघर्षांत हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद या दहशतवादी संघटनांचे डझनभर दहशतवादी मारले गेले.