Twitter Takeover Updates: टेस्ला मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी ट्विटर ही जगप्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी विकत घेतलीय. ट्विटरमधील १०० टक्के भागीदारी मस्क यांनी खरेदी केली आहे. मस्क यांनी ५४.२० डॉलर प्रतिसमभागाप्रमाणे ४४ अब्ज डॉलरला सौदा निश्चित केलाय. मस्क यांच्या या अब्जावधीच्या खरेदीवर अनेक प्रतिक्रिया येत असतानाच अमेरिकन सरकारने यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. व्हाइट हाऊसने या व्यवहारावर थेट कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे सोशल मीडिया माध्यमांच्या वापरासंदर्भात चिंतीत असल्याचे समजते. त्यांनी यापूर्वीही ही चिंता अनेकदा बोलून दाखवलीय.
मस्क यांनी ट्विटर कंपनी विकत घेतल्यानंतर व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या जेन पास्की यांनी, “यासंदर्भातील आमच्या चिंता काही नव्या नाहीत. राष्ट्राध्यक्षांनी यापूर्वीही अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसच्या वापरासंदर्भात चिंता व्यक्त केली असून त्यामध्ये त्यांनी ट्विटरसहीत इतर माध्यमांचा चुकीची माहिती पसरवण्यासाठी वापर होऊ शकतो असं म्हटलेलं,” अशी प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळेच या अब्जावधीच्या व्यवहारामुळे सोशल मीडियाबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या बायडेन यांची चिंता वाढल्याचं म्हटलं जातंय.
मात्र याचवेळी व्हाइट हाऊसने पुन्हा एकदा कलम २३० मागे घेण्याचं समर्थन केलं आहे, हा कायदा वापरकर्त्यांद्वारे पोस्ट केलेल्या सामग्रीवरील दायित्वापासून ऑनलाइन कंपन्यांचे संरक्षण करतो. म्हणजेच युझर्सने काही पोस्ट केल्यास त्यासाठी कंपन्यांना दोषी ठरवलं जात नाही. तसेच तंत्रज्ञान कंपन्यांचा कारभार पारदर्शक असावा आणि त्याची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी सरकारचा पाठिंबा आहे, असंही जेन यांनी सांगितलं.
बायडेन प्रशासनाच्या माध्यमातून घडवण्यात आलेल्या अनेक चर्चांमध्ये कठोर कायदा आणि निर्बंधांच्या माध्यमातून सोशल मीडियावर खोटी माहिती खास करुन राजकीय आणि करोनासारख्या महामारीसंदर्भातील चुकीची माहिती प्रसारित होण्यापासून रोखता येईल असं अनेकांनी अनेकदा म्हटलंय.
खोट्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी काय पावले उचलावीत यासंदर्भात आम्ही अनेकदा कंपन्यांच्या संपर्कात असतो असं पेन म्हणाल्यात. आम्ही असेच काम करत आलोय यापुढेही करत राहू पण काही बदल काँग्रेस नक्की करेल, असंही पेन कंपन्यांसंदर्भातील सरकारी धोरणाबद्दल बोलताना म्हणाल्यात.