US again targets India: अमेरिकेच्या वस्तूंवर भारताकडून वाढीव आयातशुल्क आकारले जाते, असा आरोप राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वीच केला होता. त्यानंतर भारताकडून काही प्रमाणात आयातशुल्क कमी करण्यात आले होते. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव कॅरोलिन लेविट यांनीही भारतावर टीका केली आहे. मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये विविध देशांनी अमेरिकेच्या वस्तूंवर आकारण्यात येणाऱ्या आयातशुल्काबाबत चर्चा केली. यावेळी भारताचा विशेष उल्लेख करण्यात आला. भारत अमेरिकेन मद्यावर १५० टक्के तर कृषी उत्पादनांवर १०० टक्के आयातशुल्क आकारता, असे कॅरोलिन यांनी म्हटले.
कॅरोलिन लेविट यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलताना म्हटले की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इतर देशांशी पारदर्शक आणि समतोल व्यापार वृद्धीसाठी प्रयत्नशील आहेत. यावेळी त्यांनी एका चार्ट दाखवत भारत, कॅनडा आणि जपानवर टीका केली.
कॅरोलिन लेविट म्हणाल्या, कॅनडा गेल्या अनेक दशकांपासून युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि अमेरिकन नागरिकांची फसवणूक करत आला आहे. कॅनडाने अमेरिकेच्या उत्पादनांवर आणि आमच्या लोकांवर व कर्मचाऱ्यांवर जे आयातशुल्क लादले आहे, ते इतरांपेक्षा भिन्न आहे. माझ्या हातात एक चार्ट आहे, ज्यामध्ये कॅनडाने आपल्यावर लावलेल्या आयातशुल्काची माहिती स्पष्ट दिसत आहे. अमेरिकन चीज आणि बटवर कॅनडाने जवळपास ३०० टक्के आयातशुल्क लादले आहे.
“भारतानेही आपल्यावर भरमसाठ आयातशुल्क लादले आहे. अमेरिकन मद्यावर १५० टक्के आयातशुल्क लादले आहे. एवढा कर लादला तर आपण अमेरिकन मद्य भारतात निर्यात करू शकू का? मला नाही वाटत. तसेच अमेरिकेच्या कृषी उत्पादनांवर भारताने १०० टक्के आयातशुल्क लादले आहे. तर जपानही आपल्यावर ७०० टक्के कर लादतो”, असे कॅरोलिन लेविट यांनी सांगितले.
कॅरोलिन यांनी दाखवलेल्या चार्टमध्ये भारत, कॅनडा आणि जपान यांनी लादलेल्या आयातशुल्काची माहिती देण्यात आली आहे. भारताची माहिती देताना आल्या राष्ट्रध्वजाच्या रंगात वर्तुळ केलेले आहे, त्यात भारताच्या आयातशुल्काची माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे परस्पर व्यापारी संबंधावर भर देत आहेत. गेल्या अनेक वर्षांत आपल्याला असा अध्यक्ष मिळाला आहे, जो अमेरिकन व्यापारी आणि कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. तसेच ते इतर देशांनाही निष्पक्ष आणि संतुलित व्यापाराचे आवाहन करत आहेत. मात्र दुर्दैवाने, कॅनडा गेल्या काही दशकांपासून आपल्याशी चांगला वागलेला नाही, असेही कॅरोलिन लेविट म्हणाल्या.