जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिकांनी करोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी इव्हर्मेक्टिन या औषधाचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विट करत हे औषध न वापरण्याचा इशारा दिला आहे. गोवा राज्यात सोमवारी १८ वर्षावरील सर्वांना हे औषध देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ही माहिती दिली आहे.
“नवीन लक्षणांसाठी कोणतेही औषध वापरण्याआधी त्याची सुरक्षितता आणि क्षमता जाणून घेणे महत्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही चाचण्याशिवाय कोविड -१९च्या उपचारासाठी इव्हर्मेक्टिन वापरण्यास परवानगी देत नाही” असे डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी जर्मनीच्या हेल्थकेअर आणि लाईफ सायन्सेस कंपनी मर्कचे एक जुने विधान ट्विटरवर शेअर केले आहे. यामध्ये “वैज्ञानिक कोविड १९ च्या उपचारासाठी इव्हर्मेक्टिनच्या क्षमता तपासण्यासाठी अभ्यास करत आहे. आता पर्यंत करोनाच्या उपचारासाठी हे उपयोगी ठरेल असे कोणतेही प्रमाण मिळाले नाही”, असे म्हटले होते.
Safety and efficacy are important when using any drug for a new indication. @WHO recommends against the use of ivermectin for #COVID19 except within clinical trials https://t.co/dSbDiW5tCW
— Soumya Swaminathan (@doctorsoumya) May 10, 2021
गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा जागतिक आरोग्य संघटनेने इव्हर्मेक्टिनचा वापर टाळण्याची सूचना केली आहे. याआधी मार्च महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेने इव्हर्मेक्टिनचा अतिशय कमी प्रभावी असल्याचा दावा केला होता.
काय आहे इव्हर्मेक्टिन ?
इव्हर्मेक्टिनला अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मान्यता दिली आहे. हे मलेरियासारख्या आजारांच्या उपचारांसाठी दिले जाणारे औषध म्हणून वापरले जाते. बहुतेकवेळा आतड्यांसंबंधी स्ट्रॉन्डोलायडायसिस आणि ऑन्कोसरिसियासिस विकार असलेल्या असलेल्या रूग्णांसाठी देखील हे वापरले जाते. करोनावरील उपचारांसाठी अजून पर्यंत तरी इव्हर्मेक्टिनला मान्यता मिळाली नसली तरी जगाच्या विविध भागांमध्ये याचा वापर केल्याने रुग्णांवर हे औषध परिणामकारक ठरले आहे.
अमेरिकन जर्नल ऑफ थेरेपीटिक्सच्या मे-जूनच्या अंकात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, तोंडाद्वारे इव्हर्मेक्टिन औषधाचा नियमितपणे वापर केल्यास करोना व्हायरसचा धोका कमी होण्यास मदत होते.
याआधी बांगलादेशच्या एका वैद्यकिय पथकाने दोन औषधांच्या मिश्रणाने करोनारुग्ण बरे होत असल्याचा दावा होता. या औषधांमध्ये इव्हर्मेक्टिन आणि डॉक्सीसाइक्लिन यांचा समावेश होता.