नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाला सोडून पुन्हा एकदा भाजपाची कास धरल्यानंतर आज (२८ जानेवारी) जनता दल (युनायटेड) आणि भाजपाचा शपथविधी संपन्न झाला. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी आणि भाजपाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय सिन्हा यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार पुन्हा भाजपाबरोबर जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असे सांगितले जात होते. मात्र भाजपाने धक्कातंत्राचा वापर करत दोन नव्या नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे.
सम्राट चौधरी कोण आहेत?
५४ वर्षीय सम्राट चौधरी यांच्याकडे २७ मार्च २०२३ रोजी भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सहा वर्षापूर्वी सम्राट चौधरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. २०२२ साली नितीश कुमार यांनी भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर सम्राट चौधरी काही काळ विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. सम्राट चौधरी हे बिहारमधील प्रभावशाली राजकीय घराण्यातून येतात. सम्राट चौधरी यांना प्रदेशाध्यक्ष पद देऊन भाजपाने लव (कुर्मी) आणि कुश (कुशवाहा) समाजाला स्वतःच्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न केला.
२०१४ साली सम्राट चौधरी हे राष्ट्रीय जनता दलातून १३ आमदारांना फोडून बाजूला झाले होते. त्यांनी स्वतःचा गट तयार केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. २०२२ साली भाजपाने त्यांना विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त केलं होतं.
ही आहेत नितीश कुमार भाजपाबरोबर जाण्याची कारणे?
विजय सिन्हा कोण आहेत?
५५ वर्षीय विजय सिन्हा हे बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेता होते. लखीसराई विधानसभा मतदारसंघातून २००५ पासून ते निवडून येत आहेत. २५ नोव्हेंबर २०२० ते २४ ऑगस्ट २०२२ दरम्यान ते विधानसभेचे अध्यक्षही होते. मात्र नितीश कुमार यांनी भाजपाशी युती तोडली, तेव्हा महागठबंधन सरकारने अविश्वास प्रस्ताव दाखल करून त्यांना बाजूला केले होते.
१० वर्षांत पाच वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ
नितीश कुमारांनी आज (२८ जानेवारी) नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गेल्या १० वर्षांत त्यांनी पाच वेळा वेगवेगळ्या आघाडी आणि युतीसह सत्ता स्थापन केली होती. तर, २०२२ मध्ये त्यांनी एनडीएची साथ सोडून राजद-काँग्रेसच्या महागंठबंधन सरकारमध्येही ते मुख्यमंत्री बनले होते. तर, आता दोनच वर्षांत त्यांनी महागठबंधनची साथ सोडून पुन्हा एनडीएला जवळ केले आहे. म्हणजे दोन वर्षांत त्यांनी दोनदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Video : ‘तेजस्वी यादव, आता कसं वाटतंय?’ एमआयएमच्या असदुद्दीन ओवेसींचा प्रश्न
..म्हणून मी राजीनामा दिला
राजदबरोबर असलेल्या सत्तेतून राजीनामा देण्याची वेळ का आली? असा प्रश्न नितीश कुमारांना सकाळी माध्यमांनी विचारला. त्यावर नितीश कुमार म्हणाले, राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता, त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. तुम्ही पत्रकारांनी मला यापूर्वी अनेकदा विचारल होतं. परंतु, तेव्हा मी बोलणं बंद केलं होतं. आम्ही सर्व परिस्थिती पाहत होतो. त्यानंतर मला लोक वेगवेगळे सल्ले देऊ लागले. मी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे वेगवेगळे सल्ले घेतले. त्यानंतर आज राजीनामा दिला आहे आणि आमचं सरकार विसर्जित केलं आहे.