Indian-origin ministers in Canadian Cabinet: कॅनडात मार्क कार्नी यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे. नुकताच कार्नी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडला. ज्यामध्ये भारतीय वंशाच्या अनिता आनंद आणि कमल खेरा या दोन महिलांना मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ५८ वर्षीय अनिता आनंद यांना नाविन्यता, विज्ञान आणि उद्योग मंत्री तर ३६ वर्षीय कमल खेरा यांना आरोग्य मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोण आहेत कमल खेरा?
दिल्लीत जन्मलेल्या खेरा या कॅनडाच्या संसदेत निवडून येणाऱ्या सर्वात तरुण महिलांपैकी एक आहेत. २०१५ मध्ये त्या पहिल्यांदा ब्रॅम्प्टन वेस्टमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. शालेय जीवनात असताना त्या कॅनडाला गेल्या आहेत. टोरंटोमधील यॉर्क विद्यापीठातून त्यांनी विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली.
कॅनेडीयन पंतप्रधानांच्या संकेतस्थळावर नमूद केल्यानुसार मंत्री कमल खेरा या संसदेतील सर्वात तरुण खासदार आहेत. नोंदणीकृत नर्स, स्वयंसेविका आणि राजकीय कार्यकर्त्या म्हणून त्या समाजाची सेवा करण्यात आणि आपल्या परिसरातील लोकांचे जीवनमान उंचाविण्याचे काम करत आले आहेत.
कमल खेरा यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, नर्स म्हणून काम करत असताना मी माझ्या रुग्णांची काळजी घेतली. हाच दृष्टीकोन ठेवून आता मी आरोग्य मंत्री म्हणून काम करणार आहे. पंतप्रधान मार्क कार्नी यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल मी आभारी आहे. आता बाह्या सरसावून काम करण्याची वेळ आली आहे.
कोण आहेत अनिता आनंद?
नोव्हा स्कॉशियामध्ये जन्मलेल्या आणि तिथेच बालपण गेलेल्या अनिता आनंद जस्टिन ट्रूडो यांनी राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होत्या. १९८५ मध्ये ओंटारियोला स्थलांतरित झालेल्या आनंद वकील आणि संशोधक म्हणून काम केले आहे. कॅनेडीयन पंतप्रधानांच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, टोरंटोमधील विधी महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले आहे. तसेच कॉर्पोरेट प्रशासनाचाही त्यांना अनुभव आहे.
एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, मार्क कार्नी यांच्या मंत्रिमंडळात मला नाविन्यता, विज्ञान आणि उद्योग मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी पंतप्रधानांचे आभार व्यक्त करते. नकारात्मकेतून गृहकर्ज किंवा घर भाडे अदा करता येत नाही किंवा किराणा मालाच्या किमतीही कमी होणार नाहीत. नकारात्मकतेमुळे व्यापार युद्धही जिंकता येणार नाही. उद्याच्या कॅनेडियन अर्थव्यवस्थेच्या उभारणीसाठी आम्ही लगेच कामाला लागू.
अनिता आनंद या २०१९ मध्ये पहिल्यांदा ओकव्हिलच्या खासदर झाल्या होत्या. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण मंत्री, सार्वजनिक सेवा आणि खरेदी मंत्री म्हणून याआधी काम केलेले आहे.