Tahawwur Rana Case : मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार तहव्वूर राणा याला १० एप्रिल रोजी भारतात आणण्यात आले आहे. सध्या राणा हा एनआयएच्या कोठडीत असून त्याची चौकशी केली जात आहे. राणा याच्या चौकशीचे नेतृत्व हे दोन वरिष्ठ भारतीय पोलिस सर्व्हिस (आयपीएस) अधिकार्‍यांकडे आहे. ज्यांचे नावे जया रॉय आणि आशिष बत्रा अशी आहेत.

शिकागो येथे एका प्रकरणात अटक झाल्यानंतर राणा याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होते. बॉम्बस्फोटाच्या घटनेला अखेर दीड दशकाहून अधिक काळ लोटल्यानंतर झालेल्या राणा याच्या अमेरिकेतून भारतातील प्रत्यार्पणात या दोन अधिकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता राणा भारतात आल्यानंतर हे दोघे या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या १२ सदस्यीय एनआयए पथकाचे नेतृत्व करत आहेत.

आयपीएस जया रॉय कोण आहेत?

जया रॉय या झारखंड केडरच्या २०११ बॅचच्या इंडियन पोलीस सर्व्हिस (आयपीएस) अधिकारी आहेत. त्या सध्या एनआयएच्या टीममध्ये डेप्युटी इंस्पेक्टर जनरल (डीजीपी) म्हणून कार्यरत आहेत.

त्यांचा जन्म २२ एप्रिल १९७९ साली पश्चिम बंगालमध्ये झाला असून रॉय यांनी २०११ साली यूपीएससीची परीक्षा उत्तर्ण झाल्यानंतर आयपीएस अधिकारी म्हणून सेवेला सुरूवात केली. त्या शिक्षणाने डॉक्टर आहेत, त्यांनी एमबीबीएसची पदवी घेतली आहे.

रॉय यांनी त्यांच्या सेवेच्या सुरूवातीला काही दिवस झारखंड पोलीसांबरोबर काम केले. या काळात त्यांनी आणि त्यांच्या पथकाने जामतारा येथील सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश केला. यामुळे रॉय या चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. या घटनेवर आधारीत वेब सीरिज देखील तयार करण्यात आली असून ती २०२० मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती.

२०१९ मध्ये जया रॉय यांना सेंट्रल डेप्युटेशनसाठी बोलावण्यात आले. त्या एनआयएमध्ये पोलिस अधीक्षक (एसपी) म्हणून रुजू झाल्या आणि पुढे डीआयजी बनल्या.

अधिकारी आशिष बत्रा कोण आहेत?

तहव्वूर राणा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयए पथकाचे दुसरे प्रमुख आशिष बत्रा हे आहेत. ते झारखंड केडरचे १९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

बत्रा हे सध्या एनआयए पथकाचे इन्स्पेक्टर जनरल (आयजी) म्हणून काम कर्यरत आहेत. फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी झारखंडमधील जॅग्वार अँटी – इन्सर्जन्सी युनिटचे नेतृत्व केले आहे. यानंतर बत्र यांना २०१९ मध्ये एनआयएमध्ये नियुक्त करण्यात आले. सुरूवातीला त्यांना पाच वर्षांसाठी नियुक्ती मिळाली होती मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने ती दोन वर्षांनी वाढवली आहे.

मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणा याला १० एप्रिल रोजी भारतात आणलं आहे. अमेरिकेकडून तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी मिळाल्यानंतर भारतीय तपास यंत्रणेचे एक पथक अमेरिकेला जाऊन त्याला भारतात घेऊन आले आहे. त्यानंतर राणाला न्यालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली असून आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याची चौकशी सुरू केली आहे.

दरम्यान तहव्वूर राणा केवळ मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी नव्हता तर त्याने अनेक दहशतवादी कारवाया केल्याचे पुरावे आहेत. २०१३ मध्ये अमेरिकन न्यायालयाने त्याला लष्कर-ए-तैय्यबा या दहशतवादी संघटनेची मदत करणे व डेन्मार्कमधील दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी १४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती.