महाराष्ट्रातील ‘एनडीए’च्या खासदारांना पंतप्रधान मोदींनी संबोधित केलं. तेव्हा बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “भाजपाने नाहीतर, शिवसेनेनं युती तोडली. विनाकारण वाद निर्माण करण्यात आले, तरीही आम्ही ते सहन केलं. एकीकडे सत्तेत राहायचं आणि दुसरीकडे टीका करायची, हे कसं चालणार?” यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आज त्यांनी दिल्लीत प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला.
हेही वाचा >> “भाजपाने नाहीतर शिवसेनेनं युती तोडली”, पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “एकीकडे…”
बाळासाहेब ठाकरेंच्या काळात झालेली शिवसेना – भाजपा युती २०१४ मध्ये २५ वर्षांनी तुटली. २०१४ ची विधानसभा निवडणूक शिवसेना आणि भाजपाने वेगवेगळ्या लढवल्या. मात्र, सत्ता स्थापनेसाठी हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. त्यानंतर या दोघांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक एकत्र लढवली, मात्र, निकाल लागल्यानंतर मुख्यमंत्री पदावरून या दोन्ही पक्षांत वाद निर्माण झाले. त्यामुळे ही युती पुन्हा तुटली. त्यामुळे युती कोणी तोडली यावरून सातत्याने खल केला जातो. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर दोषा-रोप केले जातात. आता याबाबत संजय राऊतांनीही स्पष्ट केले आहे.
“शिवसेनेनं युती तोडली, असं पंतप्रधान मोदी म्हणत असतील, तर ते दिशाभूल करत आहे. २०१४ ची परिस्थिती पंतप्रधानांना आठवायला हवी. २०१४ साली युती कोणी आणि का तोडली हे संपूर्ण देशानं पाहिलं. त्यानंतर शिवसेना स्वतंत्र लढली. आपली युती तुटली, आपण वेगळे झाले आहोत, असं भाजपातर्फे अधिकृतपणे एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितलं. त्यामुळे शिवसेनेची साथ कोणी सोडली, याचे जुने रेकॉर्ड पंतप्रधानांनी तपासून पाहावे,” असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा >> शरद पवारांना पंतप्रधान होण्यापासून काँग्रेसने रोखलं? लालकृष्ण अडवाणींचा उल्लेख करत संजय राऊत म्हणाले…
नरेंद्र मोदी घेतात सामनाची दखल – राऊत
सामनातील भूमिका या शिवसेनेच्या अधिकृत भूमिका आहेत. पंतप्रधांनाना सामनावर आणि शिवेसनेच्या भूमिकेवर खासदारांच्या बैठकीत चर्चा करावी लागते. कारण आम्ही ओरिजिनल आहोत. तुम्हाला याची दखल घ्यावी लागते कारण उद्धव ठाकरेंच्या भूमिका मान्य आहेत. कितीही हल्ले केले तरी सामना आणि शिवसेना शरण जात नाही, ही त्यांची वेदना त्यांनी बोलून दाखवली. ते नेहमीच सामना वाचतात आणि सामनाची दखल घेतात आणि सहकाऱ्यांनाही सांगतात की सामना माझ्यावर टीका करते, असंही संजय राऊत म्हणाले.