लसीकरणाचा वेग वाढू लागलेला असतानाच जगभरात करोनावर हळूहळू नियंत्रण मिळू लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मात्र, हे चित्र फक्त काही देशांमध्येच दिसून येत असून जगभरात अजूनही करोना ठाण मांडून बसला असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस अधानोम यांनी म्हटलं आहे. एकीकडे काही देशांमध्ये लसीकरणाचा वेग वाढला असताना अनेक देशांमध्ये लसींचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यात Delta Variant नं १११ देशांमध्ये आपले हातपाय पसरले आहेत. या पार्श्वभूमीवर करोनाची तिसरी लाट नेमकी कधी येणार? या प्रश्नावर WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी उत्तर दिलं आहे. आणि ते सगळ्यांचीच काळजी वाढवणारं आहे.

“दुर्दैवाने आपण करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पहिल्या टप्प्यावर आहोत”, असं टेड्रॉस यांनी स्पष्ट केलं आहे. “Delta व्हेरिएंटचा वेगाने होणारा प्रसार, अनेक देशांमध्ये अनेक ठिकाणी पुन्हा होऊ लागलेली गर्दी आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा योग्य प्रकारे प्रभावीपणे न होणारा वापर या गोष्टी करोनाचे रुग्ण आणि करोनामुळे होणारे मृत्यू पुन्हा वाढण्यासाठी कारणीभूत ठरल्या आहेत”, असं देखील टेड्रॉस यांनी स्पष्ट केलं आहे.

करोना सातत्याने रुप बदलतो आहे!

डॉ. टेड्रॉस यांनी करोनासंदर्भात भूमिका मांडताना त्याच्या अधिक वेगाने पसरणाऱ्या प्रकारांच्या उत्परिवर्तनांविषयी देखील इशारा दिला आहे. “गेल्या काही महिन्यांमध्ये करोनाचे रुग्ण जगभरात कमी होऊ लागलेले दिसून आले होते. व्यापक प्रमाणावर करण्यात येत असलेल्या लसीकरणामुळे हे शक्य झालं होतं. विशेषत: युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये हे घडून आलं. मात्र, आत पुन्हा एकदा करोनाचा विषाणू फैलावू लागला असून तो सातत्याने अधिकाधिक वेगाने प्रसार होऊ शकणारी त्याची रुपं बदलतो आहे”, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी दिला आहे.

१११ देशांमध्ये Delta Variant चा फैलाव!

दरम्यान, यावेळी बोलताना डॉ. टेड्रॉस यांनी घातक अशा Delta Variant विषयी देखील भिती व्यक्त केली आहे. “जगातल्या जवळपास १११ देशांमध्ये आता डेल्टा व्हेरिएंटचा फैलाव झाला आहे. लवकच तो जगभरात अस्तित्वात असलेल्या करोनाच्या विषाणू प्रकारांपैकी सर्वाधिक धोकादायक प्रकार होण्याची शक्यता आहे. कदाचित आत्तापर्यंत तो धोकादायक झालाही असेल”, असं डॉ. टेड्रॉस यांनी नमूद केलं आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या सलग ४ आठवड्यांमध्ये जगभरात करोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यासोबतच, १० आठवडे सातत्याने कमी झाल्यानंतर करोना मृतांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे.

लसपुरवठ्यात धक्कादायक भेदभाव

डॉ. टेड्रॉस यांनी करोनासंदर्भातल्या WHO च्या आपाकालीन समितीचं लक्ष जगभरात लसपुरवठ्यामध्ये केल्या जाणाऱ्या भेदभावाकडे देखील वेधलं आहे. “सध्या जगात वेगवेगळ्या देशांना लसपुरवठा करण्यात धक्कादायक असा भेदभाव केला जात असून जीवनावश्यक सामग्रीच्या उपलब्धतेमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर देशादेशांमध्ये असमानता दिसून येत आहे”, असं टेड्रॉस यांनी नमूद केलं आहे.

 

“त्या देशांना व्हायरसच्या भरवशावर सोडलंय”

दरम्यान, डॉ. टेड्रॉस यांनी लसींचा अपुरा पुरवठा होणाऱ्या देशांबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. “देशांना पुरवण्यात येणाऱ्या लसीच्या डोसमुळे जगात दोन प्रकारच्या करोनाच्या साथी दिसून येत आहेत. पहिली साथ अशा देशांमध्ये आहे जिथे मोठ्या प्रमाणावर लसीचा पुरवठा केला जात आहे. अशा देशांमध्ये निर्बंध मोठ्या प्रमाणावर उठवले जात आहेत. अनलॉक केले जात आहेत. तर दुसरी साथ अशा देशांमध्ये आहे जिथे लस पुरवठा अत्यंत कमी किंवा नाहीच आहे. या देशांना करोना विषाणूच्या भरवशावर सोडून देण्यात आलं आहे”, अशा शब्दांत डॉ. टेड्रॉस यांनी आपली खंत व्यक्त केली आहे.

Story img Loader