करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनं जगभरात भितीचं वातावरण निर्माण केलं आहे. भारतात केल्या काही दिवसांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. तिसरी लाट उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर हे करोनाचं संकट नेमकं कधी संपणार? असा प्रश्न प्रत्येकालाच पडला आहे. निर्बंधांमुळे जसा अर्थव्यवस्थांना फटका बसलाय, तसाच तो नागरिकांच्या नियमित जीवनाला देखील बसला आहे. त्यामुळ सर्वच जण करोना जगातून हद्दपार होण्याची वाट पाहात असताना त्यावर WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस अधानोम यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओमायक्रॉन आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे जगभरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सर्वच देशांनी व्यापक प्रमाणावर लसीकरण सुरू केलं असलं, तरी अजूनही मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या फक्त एकच डोस झालेली किंवा लसीचे अजिबात डोस न घेतलेली आहे. त्यामुळे करोनाचा धोका अजूनही टळलेला नसताना जागतिक आरोग्य संघटनेकडून दिलासादायक भूमिका मांडण्यात आली आहे.

२०२२मध्येच करोनाचा खेळ खल्लास?

डॉ. टेड्रॉस यांनी पत्रकार परिषदेत बोलताना करोना आणि लसीकरण याविषयी आपली भूमिका मांडली. “आज जगातला एकही देश करोनाच्या प्रभावापासून सुरक्षित राहिलेला नाही. पण जमेची बाजू ही आहे की आज आपल्याकडे करोनाशी लढा देण्यासाठी अनेक साधनं उपलब्ध आहेत. तसेच, करोनावर उपचार करण्यासाठी देखील औषधं हाती आहेत. मात्र, जगात जितकी जास्त असमानता असेल, तेवढा हा विषाणू आपण कल्पनाही करू शकणार नाही किंवा बचाव करू शकणार नाही अशा पद्धतीने घातक होऊ शकतो” अशी भिती डॉ. टेड्रॉस यांनी व्यक्त केली आहे.

कसा पराभूत होणार करोना?

करोनावर मात करायची असेल, तर आपल्याला असमानता नष्ट करावी लागेल, असं टेड्रॉस म्हणाले. “जर आपण आपल्यातली असमानता नष्ट केली, तर आपण हे करोनाचं संकट देखील नष्ट करू शकू. आपण करोना साथीच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश करत असताना मला विश्वास वाटतोय की आपण याच वर्षी करोनाला संपवू शकतो, पण फक्त आपण एकत्रपणे त्यासाठी प्रयत्न केले तर”, असं टेड्रॉस म्हणाले.

७० टक्के लोकसंख्या लसीकृत हवी!

दरम्यान, यावेळी बोलताना टेड्रॉस यांनी करोनाला पराभूत करायचं असेल, तर प्रत्येक देशातली किमान ७० टक्के लोकसंख्या पूर्ण लसीकृत असायला हवी, असं म्हटलं आहे. यासाठी सगळ्यांनी एकत्रपणे काम करून हे जागतिक लक्ष्य साधायला हवं. २०२२ च्या मध्यापर्यंत हे लक्ष्य आपण सगळ्यांनी मिळून साध्य करायला हवं, असं ते म्हणाले.

“करोनाला रोखण्यात नाईट कर्फ्यूचा उपयोग नाही, भारतासारख्या देशांनी…”, WHO च्या मुख्य वैज्ञानिकांनी स्पष्टच सांगितलं!

जगभरात प्रत्येक देशाने व्यापक लसीकरणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विकसित किंवा काही विकसनशील देशांमध्ये लसीकरणाचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, मागास देशांमध्ये अद्याप पुरेसा लसींचा साठा पोहोचलेला नाही. लसींचा साठा असला, तरी तिथल्या नागरिकांना लसीकरण करण्यासाठीची यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळेच डॉ. टेड्रॉस यांनी सुरुवातीपासूनच गरीब देशांना मदतीचा हात देण्याचं आश्वासन श्रीमंत देशांना केलं आहे.