संपूर्ण जगभरात करोनारुपी राक्षसानं हाहाकार माजवला आहे. करोना लसीकरणानंतर आता हळूहळू जनजीवन रुळावर येऊ लागलं आहे. अनेक देशात मास्क बंदी हटवण्यात आली आहे. त्यामुळे करोना शेवटच्या टप्प्यात असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. असं असताना जागतिक आरोग्य संघटनेने करोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांची आकडेवारी जाहीर केली आहे. १ जानेवारी २०२० ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत भारतात ४७ लाख लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. ही आकडेवारी भारत सरकारने जारी केलेल्या आकडेवारीच्या दहापट असून जागतिक मृतांच्या आकडेवारीच्या एक तृतीयांश आहे. जगभरात अधिकृतपणे नोंदवल्या गेलेल्या मृतांची संख्या एकूण अंदाजे १४.९ दशलक्ष आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी ही आकडेवारी चिंता वाढवणारी असल्याचं म्हटलं आहे. भविष्यातील आरोग्य आणीबाणीचा सामना करण्यासाठी देशांनी त्यांच्या क्षमतांमध्ये अधिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. जागतिक आरोग्य संघटेनेंतर्गत, शास्त्रज्ञांना जानेवारी २०२० पर्यंत आणि गेल्या वर्षाच्या अखेरीस मृत्यूच्या वास्तविक संख्येचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ही आकडेवारी देशांद्वारे प्रदान केलेल्या डेटावर आणि सांख्यिकीय मॉडेलिंगवर आधारित आहे. डब्ल्यूएचओने कोविड-१९ मुळे झालेल्या मृत्यूचे तपशील थेट दिलेले नाहीत. दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवर भारत सरकारकडून आक्षेप घेण्यात आला आहे. अंदाज मांडण्याच्या पद्धतीवर भारत सरकारने आक्षेप घेतला आहे. “अंदाज मांडणीच्या प्रक्रियेवर भारताचा आक्षेप आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोणतीही अधिकृत माहिती न घेता अंदाज जारी केला आहे.”, असं निवेदनात सांगण्यात आलं आहे.
केंद्रीय अधिकारी म्हणाले, १७ राज्यांच्या आधारे आकडेवारी जाहीर केली, मग १७ राज्यांची निवड कशाच्या आधारे करण्यात आली? सतत पाठपुरावा केल्यानंतर चार महिन्यांनी या राज्यांची नावे सांगण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेने आकडेवारीबाबत माहिती दिली नाही. नोव्हेंबरपासून केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेला १० पत्रे लिहिली, पण जागतिक आरोग्य संघटनेने कोणालाच उत्तर दिले नाही.