जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूच्या जेएन.१ या नव्या उपप्रकाराचे ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या गटात वर्गीकरण केले आहे. मात्र हा विषाणू लोकांच्या आरोग्यासाठी फार जोखीम निर्माण करणारा नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत उपलब्ध झालेल्या पुराव्यानुसार, जेएन.१ आरोग्यासाठी फार धोकादायक नाही. सध्या अस्तित्वात असलेल्या लशी या विषाणूचा प्रतिकार करत असून रुग्णांना आरोग्याच्या धोक्यापासून वाचवत आहेत, असे निवेदन जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. याआधी जेएन.१ विषाणूचा मूळ वंश बीए.२.८६ ला ही ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या गटात टाकण्यात आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट म्हणजे काय?

जागतिक आरोग्य संघटनेकडून करोना विषाणूच्या सर्व प्रकारांना व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट, व्हेरिएंट ऑफ कंसर्न आणि व्हेरिएंट अंडर मॉनिटरिंग या तीन श्रेणीत वर्गीकरण केले आहे. जेव्हा एखादा विषाणूचा प्रकार अतिवेगाने अनेक देशांमध्ये पसरत असतो आणि त्या विषाणूचे त्याच्या मूळ प्रकाराहून अधिक वेगळी रुपे आढळून येतात. तेव्हा त्या विषाणूच्या उपप्रकाराला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट या गटात वर्ग केले जाते. तर व्हेरिएंट ऑफ कंसर्न या प्रकारात विषाणूचा संसर्ग वेगाने पसरत असतो, त्याचवेळी या गटातील विषाणू आरोग्यासाठी समस्या निर्माण करतात आणि रोगप्रतिकारक शक्तीलाही जुमानत नाहीत.

हे वाचा >> करोनाचा नवा जेएन-१ उपप्रकार काय आहे? जाणून घ्या सविस्तर

अमेरिकेच्या साथ रोग नियंत्रण आणि प्रतिबंध (CDC) विभागाने या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, ८ डिसेंबर पर्यंत जेएन.१ या उपप्रकारामुळे अमेरिकेत १५ ते २९ टक्के रुग्ण वाढले होते. तसेच सीडीसीच्या वतीने असेही सांगण्यात आले की, या उपप्रकारामुळे सार्वजनिक आरोग्यासाठी फार मोठा धोका निर्माण झाल्याची परिस्थिती दिसून आलेली नाही. लशीचा आणखी एखादा डोस अमेरिकन नागरिकांना या विषाणूपासून संरक्षण देऊ शकतो.

सीडीसीच्या माहितीनुसार जेएन.१ हा उपप्रकार पहिल्यांदा सप्टेंबर महिन्यात अमेरिकेत आढळून आला होता. मागच्या महिन्यात चीनमध्ये या विषाणूचे सात रुग्ण आढळून आले होते.

भारताला किती धोका?

जगभरात गेल्या काही दिवसांपासून पिरोला आणि जेएन-१ या उपप्रकारामुळे करोना रुग्णांच्या संख्येत निश्चितपणे वाढ झालेली आहे. अमेरिका, सिंगापूर, चीन तसेच काही युरोपीन देशांत या दोन्ही उपप्रकारांमुळे करोना संसर्ग झालेले अनेक रुग्ण आढळले आहेत. भारतात ८ डिसेंबर रोजी केरळ राज्यात या विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर केंद्र सरकारने खबरदारीच्या उपाययोजना घ्यायला सुरुवात केली आहे. त्यानंतर केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये आरोग्यासंबंधी खबरदारी घेण्याचे आवाहन आतापर्यंत करण्यात आले आहे. इतरी राज्ये आपापल्यापरिने उपाययोजना करत आहेत.

स्वत:चे संरक्षण कसे करावे?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार Sars-CoV-२ ची नवनवी रुपे भविष्यातही येतच राहतील. मात्र श्वसनयंत्रणेवर हल्ला करणाऱ्या विषाणूंपासून संरक्षण करण्यासाची पद्धत एकच राहील. तुमच्या परिसरात करोना रुग्णांची संख्या वाढल्यास गर्दीच्या ठिकाणी तोंडाला मास्क लावावे. मोकळी हवा असलेल्या ठिकाणी राहिल्यास करोना संसर्गाची शक्यता कमी होते. वारंवार हात धुवायला हवेत, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who classifies omicron sub variant jn 1 as variant of interest know how dangerous to health kvg