WHO ने वायू प्रदूषणाबाबत नवीन स्तर, नवीन गुणवत्ता पातळी जाहिर केली आहे. प्रदूषकांच्या आकडेवारीचा नवा स्तर हा आरोग्यासाठी गृहित धरावा असे WHO सांगितलं आहे. याआधी WHO ने २००५ मध्ये वायू प्रदूषणाबाबतचे विविध स्तर हे निश्चित केले आले होते. आता १६ वर्षानंतर WHO ने हवेतील गुणवत्तेबाबत, प्रदूषणाबाबत नवीन स्तर जाहिर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुरुवातीला PM 2.5 (particulate matter) या प्रदुषकाचा हवेतील मधील एका क्बुविक मीटरमागे २५ मायक्रोग्रॅम्स हा स्तर सुरक्षित समजला जायचा. आता बदललेल्या स्तरानुसार १५ मायक्रोग्रॅम्स हा स्तर सुद्धा सुरक्षित नसल्याचं WHO ने जाहिर केलं आहे. वायू प्रदूषणामध्ये जी सहा सर्वसाधारण प्रदूषके ही गृहित धरली जातात त्या सर्वांचा हवेतील गुणवत्ता स्तर हा बदलवण्यात आला आहे. PM2.5, PM10, ओझोन, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड यांच्या हवेतील गुणवत्ता स्तरामध्ये बदल करण्यात आले आहेत.

वायू प्रदूषणाचे जाहिर केलेले नवीन स्तर लक्षात घेता जवळपास संपुर्ण भारत हा हवेच्या प्रदूषणाने प्रदूषित असल्याचे गृहित धरावं लागणार आहे अशी परिस्थिती सध्या आहे. फक्त भारतच नाही तर २००५ च्या स्तरानुसार प्रदूषित म्हणून जाहिर केलेल्या देशांतील थेट ९० टक्के लोकसंख्या ही नव्या स्तरानुसार गंभीर अशा स्तरावर मोडत असल्याचं WHO ने म्हंटले आहे, नव्या स्तरानुसार जगातील आणखी लोकसंख्या आणि देशांचीही भर पडणार आहे.

वायू प्रदूषणाबाबत विविध पातळीवर गेली काही वर्ष अभ्यास आणि संशोधन केल्यानंतर असे लक्षात आले की वायू प्रदुषण हे मानवासाठी सर्वात घातक आहे, म्हणूनच वायू प्रदूषणाचे नवीन स्तर जाहिर करण्यात आल्याचं WHO ने म्हंटले आहे. निव्वळ हवेच्या प्रदुषणामुळे विविध आजार होत ७० लाख लोक दरवर्षी मृत्युमुखी पडत असल्याचं WHO ने म्हंटले आहे.

दक्षिण आशियातील भारतासारखे देश खास करुन दिल्लीसारखी शहरे ही वायू प्रदूषणाच्याबाबतीत गंभीर पातळीवर आहेत. प्रदूषणाच्या नवीन स्तरानुसार PM 2.5 हे प्रदूषक हे दिल्लीसारख्या शहरात तब्बल १७ पट जास्त आहे. मुंबईत वायू प्रदूषण नव्या स्तरानुसार ९ पटीने जास्त, कोलकाता शहरात ८ पटीने तर चेन्नई शहरात ५ पटीने जास्त ठरणार आहे.

एकीकडे WHO ने २००५ ला जागतिक पातळीवर हवेतील प्रदूषणाबाबत स्तर ठरवला असताना भारतानेही स्वतः देशातील हवेतील प्रदूषणबाबत स्तर निश्चित केला होता, जो WHO च्या तुलनेत कितीतरी शिथील असल्याची टीका अनेकदा अभ्यासकांनी केली आहे. WHO ने ठरवलेले स्तर हे देशांवर बंधनकारक नाहीत, ते मानवी आरोग्याकरता जाहिर करण्यात आले आहेत. तेव्हा उद्योग, पर्यटन व्यवसायाला फटका बसू नये यासाठी अनेक देश सोईनुसार स्वतःचे वायू प्रदूषणाबाबतचे स्तर जाहिर करत आले आहेत. यामुळेच WHO म्हणण्यानुसार जगातील अनेक देशांत वायू प्रदूषणाची पातळी धोकादायक स्तरावर आहे आणि आता जाहिर केलेल्या नव्या स्तरानुसार ती आणखी गंभीर पातळीच्या पलिकडे गेली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who declared new levels of air pollution asj82