जागतिक आरोग्य संघटनेने झिका विषाणूच्या प्रसारामुळे जागतिक आपत्तीची परिस्थिती जाहीर केली आहे. या विषाणूमुळे होणाऱ्या रोगात ब्राझीलमध्ये अनेक नवजात बालकांच्या मेंदूची वाढ खुंटली असून अमेरिकेतही काही मुले मेंदूत व्यंग घेऊन जन्माला आली आहेत. ही अतिशय वेगळी घटना आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक आरोग्य संघटनेची तातडीची बैठक जीनिव्हा येथे झाली, त्या वेळी या विषयातील तज्ज्ञ उपस्थित होते. झिका विषाणूचा प्रादुर्भाव ब्राझीलमध्ये गेल्या वर्षी झाला होता व त्यामुळे नवजात बालकांच्या मेंदूची अपुरी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मायक्रोसेफली या रोगात नवजात बालकांच्या मेंदूची अपुरी वाढ झाल्याचे दिसून आले आहे, असे संघटनेच्या महासंचालक मार्गारेट चॅन यांनी म्हटले आहे. अमेरिकेत झिका विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या पुढील वर्षी ४० लाख असेल असा अंदाज देण्यात आला असून त्यासाठी व्यापार व प्रवासावर र्निबध लादण्याची शिफारस करण्यात आलेली नाही. जर तुम्ही प्रवास लांबणीवर टाकल्याने काही अडणार नसेल, तर तसे करण्यास हरकत नाही. जर प्रवास करायचा असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे, व्यक्तिगत पातळीवर संरक्षक उपाययोजना करणे गरजेचे आहे. लांब बाह्य़ांचे व पूर्ण कपडे, शर्ट पँट व डास प्रतिरोधकांचा वापर करणे गरजेचे आहे. २०१४ मध्ये पश्चिम आफ्रिकेत इबोला विषाणूचा प्रसार झाला होता, त्या वेळी आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली होती त्या रोगात एकूण ११ हजार लोक मरण पावले होते. आपत्कालीन स्थिती जाहीर केल्याने या रोगावर जास्त संशोधन करणे, पैसा खर्च करणे, प्रसार रोखणे, उपचार व लशी विकसित करणे गरजेचे आहे असे स्पष्ट झाले आहे.

झिका विषाणू
* युगांडातील झिका जंगलातील ऱ्हिसस माकडात १९४७ मध्ये प्रथम सापडला
* एडिस एजिप्ती डासामुळे प्रसार, लैंगिक संबंधातूनही पसरल्याचे स्पष्ट
नवजात बालकात मेंदूची वाढ कमी होते.
* लक्षणे-ताप, पुरळ, डोळे लाल होणे, स्नायू दुखणे
* कालावधी- २-७ दिवसांत लक्षणे दिसतात, ८० रुग्णांत एकही लक्षण दिसत नाही.
* प्रसार-आफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिका, पॅसिफिक
गर्भवती महिलांना ब्राझील ऑलिम्पिक टाळण्याचा सल्ला

Story img Loader