दिल्ली उच्च न्यायालयात सध्या एक खमंग प्रकरण गाजत आहे. न्यायालयात तसे अनेक प्रकारचे खटले दाखल होत असतात. दिल्ली उच्च न्यायालयात दाखल झालेला खटला बटर चिकन आणि दाल मखनी या खाण्याच्या दोन पदार्थांबद्दल आहे. भारतीयांच्या काय तर जगभरातील अनेक लोकांच्या या दोन आवडत्या डीश आहेत. या दोन पदार्थांना घेऊन दिल्लीतील मोती महल आणि दर्यागंज कायदेशीर लढाई लढत आहेत. या दोन्ही पदार्थांचे शोधकर्ते आम्हीच आहोत, असे या दोन्ही हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.
बार अँड बेंच या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, मोती महल हॉटेलने दर्यागंज हॉटेल मालकांवर खटला दाखल केला आहे. दर्यागंज हॉटेलने बटर चिकन आणि दाल मखनीचे शोधकर्ते असे ब्रिदवाक्य लावून घेतल्याबद्दल मोती महलने आक्षेप नोंदविला आहे. अशा दाव्यांमुळे ग्राहकांमध्ये गैरसमज पसरत आहे. आमच्या हॉटेलचा या दोन पदार्थांशी संबंध आहे, असे मोती महल हॉटेल मलाकांचे म्हणणे आहे.
या खटल्याची पहिली सुनावणी १६ जानेवारी रोजी झाली. न्यायाधीश संजीव नरुला यांनी दर्यागंज हॉटेलला समन्स बजावून एक महिन्याच्या आत लेखी निवेदन सादर करावे, असे निर्देश न्यायालयाने दिले असल्याची बातमी बार अँड बेंच संकेतस्थळाने दिली आहे. मोती महल हॉटेलचे मालक दिवंगत कुंदन लाल गुजराल यांनी या दोन्ही पदार्थांचा शोध लावला होता, असे मोती महल हॉटेलने आपल्या याचिकेत म्हटले आहे.
जुन्या दिल्लीमधील ‘मोतीमहल’ या सुप्रसिद्ध हॉटेलचे लाला कुंदनलाल गुजराल यांनी बटर चिकनला जन्म दिला होता. गुजराल हे आपल्या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात चिकन तंदुरी बनवत असत. मात्र दिवसाअखेरीस उरलेल्या रश्शाचं काय करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. त्यावर उपाय म्हणून या रश्शात मख्खन व टोमॅटोची पेस्ट वापरून त्यात चिकनचे तुकडे घातले जायचे. बटरचा मुबलक वापर करून तयार केलेला हा पदार्थ अल्पावधीतच लोकप्रिय झाला. याच प्रकारे काळ्या डाळीचा अशाच पद्धतीने रस्सा तयार करून त्याला दाल मखनी म्हटले गेले.
‘बटर चिकन’ की ‘चिकन टिक्का मसाला’ हा राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न असूही शकतो, पण…
दरम्यान दर्यागंज हॉटेलचे न्यायालयात प्रतिनिधित्व वरिष्ठ अधिवक्ता अमित सिब्बल करत आहेत. त्यांनी मोती महल हॉटेलच्या दाव्यावर टीका केली. मोती महल हॉटेलचा दावा निराधार असल्याचे त्यांनी म्हटले. बार अँड बेंच या संकेतस्थळाने आपल्या बातमीमध्ये सांगितले की, दर्यागंज हॉटेलने प्रतिवाद करताना कोणताही खोटा युक्तीवाद केलेला नाही, असे सांगितले. तसेच मुळ मोती महल हॉटेलचे मालक हे पाकिस्तानच्य पेशावरमध्ये दर्यागंज हॉटेलबरोबर कार्यरत होते, असेही सांगण्यात आले आहे. आता या खटल्याची पुढील सुनावणी २९ मे रोजी होणार आहे.