Who is Archit Dongre from Pune : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा २०२४ च्या परीक्षेत पुण्याच्या अर्चित डोंगरे याने तिसरा रँक पटकावला आहे. UPSC ने निवडलेल्या १००९ उमेदवारांमध्ये अर्चितने तिसरा क्रमांक मिळवल्याने महाराष्ट्राची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंचावली आहे. दरम्यान, अर्चित डोंगरे हा मुळचा पुण्याचा असून त्याने तमिळनाडूच्या व्हीआयटी व्हेल्लोर येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.

अर्चितने मुंबईतून शालेय शिक्षण घेतलं असून पुण्यातून बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर तामिळनाडू येथील व्हीआयटी व्हेल्लोर येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतली. या पदीवनंतर त्याने एका आयटी कंपनीत ११ महिने कामही केलं. पण युपीएससीच्या तयारीसाठी त्याने नोकरी सोडली. आयटी क्षेत्रात काम करण्यापेक्षा नागरी सेवेत त्याला काम करणे अधिक पसंत होते, त्यामुळे त्याने नोकरीचा राजीनामा दिला आणि नागरी सेवा परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली. यासंदर्भात त्याने त्याच्या मॉक इंटरव्ह्युमध्ये माहिती दिली आहे.

युपीएससीने अद्याप राज्यनिहाय यादी जाहीर केली नसली तरीही महाराष्ट्रातून अर्चितलाच सर्वाधिक रँक आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रातून पहिला आला आहे. २०२३ मध्येही अर्चितने नागरी सेवा उत्तीर्ण केली होती. परंतु, त्यावेळी तो १५३ वा आला होता.

दिल्लीनंतर, पुणे हे नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध केंद्र आहे. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असंख्य वर्ग आहेत जिथे वर्ग आणि अनेक ग्रंथालये आहेत. दरवर्षी, पुण्याचे विद्यार्थी नागरी सेवा परीक्षेच्या यादीत येतात. यंदा अर्चितने या यादीत आपले नाव समाविष्ट केल्याने पुणेकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

युपीएससीने २०२४ च्या परीक्षेसाठी आयएएस, आयपीएससह एकूण ११३२ पदांसाठी भरती जाहीर केली होती. यामध्ये १००९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. यापैकी ७२५ पुरुष उमेदवार आणि २८४ महिला उमेदवारांचा समावेश आहे. १००९ उमेदवारांपैकी ३३५ उमेदवार जनरल कॅटगेरी, १०९ उमेदवार आर्थिक दुर्बल घटक (EWS), ३१८ उमेदवार इतर मागासवर्गीय (OBC), १६० अनुसूचित जाती (SC), ८७ अनुसुचित जमाती (ST) प्रवर्गातील आहेत. तर, ४५ उमेदवार दिव्यांग श्रेणीतील आहेत. सप्टेंबर २०२४ युपीएससीच्या परीक्षा झाल्या. तर,७ जानेवारी २०२५ पासून मुलाखतींना सुरुवात झाली.

महाराष्ट्राचे अनेक उमेदवार विजयी

दरम्यान, युपीएससीच्या पहिल्या क्रमांकात महाराष्ट्रातील अर्चित डोंगरेचाही क्रमांक आला आहे. त्याने तिसरा क्रमांक पटकावला असून तो मुळचा पुण्याचा आहे. तर, ठाण्यातील तेजस्वी देशपांडे हिने ९९ वा क्रमांक पटकावला असून ठाण्याच्याच अंकिता पाटीलनेही ३०३ क्रमांक मिळवला आहे.