New Chief Minister of Delhi Atishi Marlena: अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जबाबदारी कुणाकडे सोपवावी? याबाबत बरीच चर्चा झाली. ही चर्चा जशी पक्षांतर्गत होत होती, तशीच ती राजकीय वर्तुळातही झाल्याचं पाहायला मिळालं. पक्षातली काही नावं सातत्याने या पदासाठी चर्चेत होती. त्यात आतिशी यांचं नाव सर्वात वर होतं. अखेर केजरीवाल यांनी त्यांचंच नाव मुख्यमंत्रीपदासाठी निवडलं. त्यामुळे शीला दीक्षित यांच्यानंतर प्रथमच दिल्लीची सूत्रं एका महिला मुख्यमंत्र्यांच्या हातात जाणार आहेत. या अकस्मात आलेल्या मुख्यमंत्रीपदामुळे आतिशी चर्चेत आल्या आहेत. पण या चर्चेत फक्त त्यांचं नावच असून त्यांच्या आडनावाचा उल्लेख त्या स्वत:देखील करत नाहीत. यामागे २०१८ साली घडलेल्या काही घडामोडी कारणीभूत आहेत.
दिल्लीच्या नवनियुक्त मुख्यमंत्री आतिशी यांचं पूर्ण नाव तसं आतिशी सिंग आहे. त्यात आतिशी या त्यांच्या मुख्य नावापुढे दुसरं नाव मार्लेना असंदेखील आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचा अधिकृत उल्लेख आतिशी मार्लेना सिंग असा आहे. २०१८ मधील घडामोडींनंतर त्यांनी लढवलेल्या निवडणुकांसाठी प्रतिज्ञापत्रामध्येही त्यांनी त्यांचं नाव आतिशी मार्लेना असंच नमूद केलं आहे. पण मार्लेना हे त्यांचं आडनाव नसून दुसरं नाव असल्याचं सांगितलं जातं. पुढच्या दोन नावांचं स्थान काहीही असलं, तरी सामाजिक जीवनात आतिशी फक्त त्यांचं पहिलंच नाव वापरतात. मग ते माध्यमांमधील प्रतिक्रियांपासून सोशल मीडियावरील प्रोफाईलपर्यंत त्यांचं हेच नाव दिसतं.
काय घडलं होतं २०१८मध्ये?
आतिशी यांच्या या ‘एकनावी’ निर्णयामागे सहा वर्षांपूर्वी २०१८ च्या निवडणुकांपूर्वीच्या घडामोडी कारणीभूत ठरल्या. हिंदुस्थान टाईम्सनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी आम आदमी पक्षाकडून २०१८ पासूनच उमेदवारांची निवड व घोषणा सुरू झाली होती. त्यानुसार आतिशी यांना पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. यावेळी अचानक आतिशी यांनी त्यांच्या नावातील दुसरं नाव म्हणजेच ‘मार्लेना’ हे पक्षाच्या सर्व नोंदींमधून आणि प्रचार साहित्यामधून काढण्यास सांगितलं.
पक्षातील एका पदाधिकाऱ्याच्या मते भाजपाकडून केल्या जाणाऱ्या प्रचारामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. मार्लेना या नावाचा दाखला देऊन लोकांमध्ये अपप्रचार करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात असल्याचं आपकडून सांगण्यात आल्याचं हिंदुस्थान टाईम्सनं तेव्हा दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
“मला वेळ वाया घालवायचा नाही”
दरम्यान, तेव्हा आतिशी यांना त्यांच्या नावातून मार्लेना काढण्याच्या निर्णयाबाबत विचारणा केली असता मला माझी ओळख सिद्ध करण्यामध्ये आता वेळ घालवायचा नाही, असं उत्तर त्यांनी दिलं होतं. आतिशी यांच्या या निर्णयाचं तेव्हा आम आदमी पक्षाकडून समर्थन करण्यात आलं होतं. आपल्या जातीचा मतांच्या राजकारणासाठी वापर न करणाऱ्या आतिशी यांना मार्लेना हे नाव वगळण्यासाठी लक्ष्य केलं जात आहे, अशीही प्रतिक्रिया तेव्हा आपमधून दिली जात होती.
‘मार्लेना’ नावामागे काय आहे इतिहास?
दरम्यान, हिंदुस्थान टाईम्सनं आतिशी यांच्या मार्लेना या नावामागचा इतिहास आपच्या हवाल्याने दिला आहे. त्यानुसार, आतिशी यांचे आई-वडील अर्थात डॉ. तृप्तावाही आणि डॉ. विजय सिंग यांच्यावर डाव्या विचारसरणीचा प्रभाव होता. त्यांनी कार्ल मार्क्स आणि व्लादिमीर लेनिन या दोन ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची नावं एकत्र करून मार्लेना हे नाव त्यांनी ठेवलं होतं.
“माझं खरं आडनाव सिंग आहे. मी पंजाबी राजपूत कुटुंबातली आहे. जर मला मतांसाठी खरंच काही करायचं असतं, तर मी माझं खरं आडनाव वापरलं असतं. खरंतर माझा हेतू याच्या अगदी उलट आहे. मला लोकांना माझी ओळख पटवून देण्यात वेळ घालवायचा नाहीये. ही निवडणूक मी शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील आमची कामं व पूर्व दिल्लीसाठीचं माझं धोरण याच मुद्द्यांवर लढवू इच्छिते”, असं स्पष्टीकरण आतिशी यांनी तेव्हा दिलं होतं.