Mehul Choksi : पंजाब नॅशनल बँकेत कोट्यवधींचा घोटाळा करणारा कर्जबुडव्या मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी त्याला सीबीआयच्या विनंतीवरुन अटक करण्यात आली आहे. मेहुल चोक्सी हा हिरे व्यापारी होता. कोट्यवधींचा कर्ज घोटाळा करुन तो पळाला होता. १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप मेहुल चोक्सी आणि त्याचा भाचा नीरव मोदीवर आहे. दरम्यान त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या बार्बरा जबरिकाचं नाव आता चर्चेत आलं आहे. बार्बरा जबरिका कोण आहे? आपण जाणून घेऊ.

मेहुल चोक्सीवर काय आरोप आहेत?

१) मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी हे पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यात आरोपी आहेत.

२) मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी १३ हजार ५०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.

३) नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना एलओयू(लेटर ऑफ अंडरटेकिंग), फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट मिळवल्याचा आरोप आहे.

२०२१ मध्ये समोर आली होती मेहुल चोक्सीच्या हनी ट्रॅपची कहाणी

२०२१ मध्ये मेहुल चोक्सीने आपण हनी ट्रॅप आणि अपहरणाच्या कटात अडकल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी पहिल्यांदा बार्बरा जबरिका हे नाव समोर आलं होतं. मेहुल चोक्सीने तेव्हा बार्बरा जबरिका या हंगेरीच्या महिलेने आपल्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवलं असं म्हटलं होतं. मेहुल चोक्सीने सांगितल्यानुसार बार्बराने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यानंतर त्याचं अपहरण करुन एका होडीत बसवलं त्यानंतर ती त्याला अँटीग्वाहून डॉमनिका या ठिकाणी घेऊन गेली. मेहुल चोक्सीने तेव्हा हा दावाही केला होता की त्याला डॉमनिकाला आणण्याचा जो कट रचला गेला बार्बरा त्याच कटाचा भाग होती असा आरोप तेव्हा मेहुल चोक्सीने केला होता.

कोण आहे बार्बरा जबरिका?

बार्बरा जबरिकाच्या LinkedIn प्रोफाईलवर ती एक बल्गेरियाची प्रॉपर्टी एजंट आहे असा सांगण्यात आलं आहे. तसंच आपण एक अनुभवी सेल्स निगोशिएटर आहोत असंही तिने म्हटलं आहे. तसंच तिला रिअर इस्टेटमधला अनुभव असल्याचाही दावा तिने LinkedIn वर केला आहे.

मेहुल चोक्सीच्या पत्नीने बार्बरा बाबत काय सांगितलं?

मेहुल चोक्सीची पत्नी प्रीती हिनेही हा आरोप केला की मेहुल चोक्सीला हनी ट्रॅप करण्याच्या कटात बार्बरा जबरिका सामील होती. मेहुल चोक्सी आणि बार्बरा २०२० मध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यानंतर मेहुल चोक्सीचा हनी ट्रॅप मध्ये अडकवण्यात आल्याचं प्रीतीने म्हटलं होतं. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.

बार्बराने फेटाळले होते आरोप

बार्बराने आपल्याला हनी ट्रॅप केलं असा आरोप मेहुल चोक्सीने केला होता. पण त्याचे हे आरोप बार्बराने फेटाळले होते. तिचं म्हणणं होतं की जे अपहण झाल्याचं मेहुल चोक्सी सांगतो आहे त्या दिवसाच्या एक दिवस आधी मेहुलने आपल्याला डिनरसाठी बोलवलं होतं. त्या ठिकाणाहून जबरदस्तीने तो आपल्याला दुसरीकडे घेऊन गेला. तसंच मी चोक्सीची गर्लफ्रेंड वगैरे काहीही नाही. मी त्याला हनीट्रॅपही केलं नाही असं म्हणत बार्बराने प्रीती चोक्सीचे आरोपही फेटाळले होते. एनडटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

१२ एप्रिल रोजी मेहुल चोक्सीला अटक

दरम्यान शनिवारी म्हणजेच १२ एप्रिलला मेहुल चोक्सीला भारताच्या सांगण्यावरुन बेल्जियम पोलिसांनी अटक केली. त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर लोकांना पुन्हा एकदा बार्बराचं कनेक्शन आणि हनीट्रॅपच्या आरोपांच्या या बातम्या आठवल्या आहेत.