मनीषा देवणे
पूर्वेकडील महत्त्वाच्या ओडिशात लोकसभेबरोबरच विधानसभेसाठी एकाच वेळी मतदान होत आहे. दोन दशकांहून अधिक काळ तेथे बिजू जनता दलाच्या (बिजद) नेतृत्वाखालील सरकार आहे. ओडिशाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद बिजदचे सर्वेसर्वा नवीन पटनायक भूषवत आहेत. आता पुन्हा ते सत्तेत येणार काय? याची उत्सुकता आहे. भाजप-बिजद यांची २००८ पर्यंत आघाडी होती. कंधमाळ येथील दंगलीनंतर हे दोन्ही पक्ष वेगळे झाले.
अर्थात केंद्रात बिजदने भाजपला वेळोवेळी संसदेत महत्त्वाच्या विधेयकांवर मदत केली. यंदाही या दोन्ही पक्षांमध्ये युतीच्या अनुषंगाने बोलणी सुरू होती, मात्र जागांवरून ती फिस्कटल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर लढणार आहेत. काँग्रेसला येथे फारशी संधी नाही.
हेही वाचा >>>महाविकास आघाडीत जागावाटपावरून रुसवेफुगवे
गेल्या लोकसभेत वाढलेल्या जागांमुळे भाजपचा विश्वास दुणावला आहे. दोन दशकांहून अधिक काळ बिजद सत्तेत आहे तसेच पटनायक यांचे वय पाहता भाजप संधी मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहे. अनेक कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचल्याने नवीन पटनाईक हे जनतेत लोकप्रिय आहेत.
भाजपची भिस्त पंतप्रधानांच्या करिष्म्यावर आहे, तर बिजदकडे नवीन पटनायक यांच्यासारखा अनुभवी चेहरा आहे. २०१९ च्या लोकसभेत भाजपच्या सात जागा वाढल्या होत्या. तर बिजदला १२ जागा मिळाल्या असल्या तर मतांची टक्केवारी पाहता भाजप (३९ टक्के मते) आणि बिजद (४३ टक्के मते) यांच्यात केवळ चार टक्के मतांचे अंतर होते. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास येथे दुणावला आहे. राज्यातील आघाडीच्या दोन पक्षांमध्ये युतीस पण अनेक स्थानिक नेत्यांचा याला विरोध होता. शिवाय लोकसभेच्या पुरी मतदारसंघासारख्या काही जागांवरून बोलणी फिस्कटली.
काँग्रेसला ओडिशात मिळणाऱ्या मतांची टक्केवारी बिजद आणि भाजपच्या तुलनेत कमी आहे. मागील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला एक जागा मिळाली होती आणि १३.४ टक्के मते मिळाली होती. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील जात गणनेसारख्या मुद्दय़ाचा फायदा होऊन यंदा काँग्रेसच्या जागा वाढतात का हे पाहणेही औत्सुक्याचे आहे.
हेही वाचा >>>तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
बिजू जनता दलाने अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलले आहे. भाजपकडून लोकसभेला संबित पात्रा, केंद्रीय मंत्री धर्मेद्र प्रधान, जुएल ओराम यासारखे ज्येष्ठ नेते येथे मैदानात आहेत. बिजदला रामराम करून आलेल्या भर्तृहरि महताबसारख्या नेत्यांनाही भाजपने उमेदवारी दिली आहे.
केंद्र सरकारच्या विकास योजना, राम मंदिरसारखे विषय भाजपकडे आहेत तर बिजदनेही येथे राम मंदिराला तोडीस तोड जगन्नाथ हेरिटेज कॉरिडोरवर ९०० कोटींहून अधिक खर्च करून जनतेला पर्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
ओडिशात यंदा बिजु जनता विरूद्ध भाजप असाच सामना आहे. केंद्रात बिजदने भाजपला वेळोवेळी सहकार्य केले आहे. मात्र जागावाटपावरून या दोन्ही पक्षांची आघाडी होऊ शकली नाही.
पुरीची जागा प्रतिष्ठेची
’बिजदने पुरी आणि कटकसारख्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवार बदलले आहेत. पुरीमध्ये भाजपचे उमेदवार संबित पात्रा यांच्यासमोर बिजदने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांना उमेदवारी दिली आहे. पात्रा आणि पटनायक यांचा गेल्या निवडणुकीत पराभव झाला होता.
’ पुरी येथून चार वेळा संसदेत निवडून गेलेल्या पिनाकी मिश्रा यांच्याऐवजी पटनायक यांना बिजदने संधी दिली आहे.
२०१९ लोकसभा निवडणुकीची स्थिती
एकूण जागा – २१
बिजद – १२
भाजप – ०८
काँग्रेस – ०१