Canada New PM : कॅनडाला लवकरच नवीन पंतप्रधान मिळणार आहेत. लिबरल पार्टीच्या निवडणुकीत ५९ वर्षीय मार्क कार्नी यांनी विजय मिळवला आहे. कार्नी हे पंतप्रधान म्हणून जस्टिन ट्रुडो यांच्या जागा घेणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेबरोबर सध्या सुरू असलेल्या ‘टॅरिफ वॉर’ दरम्यान कॅनडाला नवीन पंतप्रधान मिळणार आहे. कॅनडाचे भारताबरोबरचे संबंध देखील गेल्या काही दिवसांपासून तणावाचे राहिले आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसात कार्नी यांनी पद स्वीकारल्यानंतर त्यांची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जानेवरीमध्ये जस्टीन ट्रूडो यांनी कॅनडाचे पंतप्रधान पद सोडण्याची घोषणा केली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी लिबरल पार्टीच्या निवडणुकीत जवळपास १ लाख ५२ हजार सदस्यांनी मतदान केले. यापैकी ८६ टक्के मते ही कार्नी यांनी मिळाली. या निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकावर माजी अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड या राहिल्या. पंतप्रधान पदावर कार्नी यांच्या नियुक्तीनंतर कॅनडामध्ये जस्टिन ट्रुडो यांचे ९ वर्षांचे शासन संपुष्टात येणार आहे.

कोण आहेत मार्क कार्नी?

५९ वर्षीय मार्क कार्नी यांचा जन्म १६ मार्च १९६५ रोजी नॉर्थवेस्ट टेरिटरीजच्या फोर्ट स्मिथ येथे झाला. त्यांचे संगोपन एटमॉन्टन, अल्बर्टा येथे झाले. कार्नी यांनी २००८ ते २०१३ पर्यंत बँक ऑफ कॅनडा आणि २०१३ ते २०२० पर्यंत बँक ऑफ इंग्लंडचे संचालक म्हणून काम केले आहे. २००८ च्या आर्थिक संकटाच्या काळात कॅनडाला सावरण्याचे काम केल्यानंतर, १६९४ साली स्थापन झालेल्या बँक ऑफ इंग्लंडचे संचालक म्हणून नियुक्ती मिळालेले ते पहिल गैर ब्रिटीश व्यक्ती होते.

२०२० मध्ये त्यांना हवामान कार्यवाही आणि अर्थ यासंबंधी संयुक्त राष्ट्राचे विशेष दूत म्हणून काम करण्यास सुरूवात केली. कार्नी हे गोल्डमन सॅक्सचे माजी कार्यकारी आहेत. २००३ मध्ये बँक ऑफ कॅनडाचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी त्यांनी लंडन, टोकियो, न्यू यॉर्क आणि टोरंटो येथे १३ वर्षे काम केले. मात्र कार्नी यांना राजकारणाचा अनुभव नाही.

मार्क कार्नी यांनी १९८८ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवी मिळवली. अनेक कॅनेडियन लोकांप्रमाणे त्यांनी हार्वर्डसाठी बॅकअप गोलकीपर म्हणूनआईस हॉकी देखील खेळली आहे. कार्नी यांच्याकडे कॅनेडियन, यूके आणि आयर्लंडचे नागरिकत्व होते. अखेर त्यांनी इतर दोन देशांचे नागरिकत्वे सोडून फक्त कॅनेडियन नागरिकत्व घेण्याचा निर्णय घेतला. त्यांची पत्नी डायना या ब्रिटिश वंशाच्या आहेत आणि त्यांना चार मुली आहेत.