३१ जुलैच्या दिवशी हरियाणातील नूंह या ठिकाणी जातीय दंगली घडल्या. या प्रकरणात फरीदाबाद या ठिकाणाहून गोरक्षक समुहाचा प्रमुख बिट्टू बजरंगीला अटक करण्यात आली आहे. दंगल भडकवणे, हिंसाचार, सशस्त्र दरोडा यांसह इतर गुन्हे केल्याचेही आरोप आहेत.
बिट्टू बजरंगीशी संबंधित पाच फॅक्ट्स
बिट्टू बजरंगी हा फरीदाबाद येथील गोरक्षक बजरंग फोर्सचा प्रमुख आहे. हा समूह सोशल मीडियावर स्वतःची ओळख पशू बचाव सेवा दल असल्याचं सांगतं. सोशल मीडियातल्या पेजेसवर चिथावणी देणाऱ्या पोस्ट करणं हे देखील हा समूह करतो. लव्ह जिहादवर त्यांनी अनेक पोस्ट केल्या आहेत.
बिट्टू बजरंगी बजरंग दलाचा नेता मोनू मानेसरचा सहकारी मानला जातो. नूंहमध्ये जो हिंसाचार झाला त्याची चौकशी अद्याप सुरु आहे. मोनू मानेसरवर दोन मुस्लिम पुरुषांची हत्या केल्याप्रकरणी संशयित आहे. मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. अटक टळावी म्हणून मानेसरही सोशल मीडियाचा आधार घेत असतो.
बिट्टू बजरंगीवर हरियाणातल्या नूंह या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या आयोजित रॅलीमध्ये चिथावणीखोर व्हिडीओ व्हायरल करुन धार्मिक तेढ वाढवल्याचा आरोप आहे. बिट्टू बजरंगीला ४ ऑगस्ट रोजीही अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीन मिळाला होता.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बिट्टू बजरंगी आणि त्याच्या साथीदारांवर गर्दीवर हल्ला केल्याचाही आरोप आहे. पोलिसांनी त्यावेळी त्यांच्याकडची शस्त्रं जप्त केली. त्यावेळी बिट्टू बजरंगीच्या साथीदारांनी पोलीस व्हॅनवरही हल्ला केला. तसंच पोलिसांना धमकीही दिली होती.
बिट्टू बजरंगीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या १५ एफआयआरमध्ये दंगल, बेकायदा सभा घेणं, लोकसेवकांना कर्तव्य निभावण्यापासून रोखणं, सशस्त्र दरोडा आणि धमकी देणं असे आरोप आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
बिट्टू बजरंगीला अटक कशी झाली?
बिट्टू बजरंगीला पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले होते. या पथकात २० हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश होता. बिट्टूला पकडण्यासाठी पोलिसांनी प्लान आखला होता. त्यानुसार, त्यांनी साध्या वेषातच अटक कार्य राबवलं. साध्या वेषात आलेल्या पोलिसांच्या हाती फक्त लाठ्या होत्या. पोलीस आल्याचे समजताच बिट्टू पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, पोलिसांनी फरीदाबादच्या डेबुआ येथे त्याचा पाठलाग करत त्याला पकडले.