Who is Shama Mohamed: काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी सोमवारी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला लठ्ठ म्हटले. तसेच भारतीय संघाचा कर्णधार म्हणून ते अप्रभावी आहे, अशीही टीका शमा मोहम्मद यांनी केली. या टीकेनंतर भाजपासह क्रिकेट चाहत्यांनी शमा मोहम्मद यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर काँग्रेसने नमती भूमिका घेत शमा मोहम्मद यांना पोस्ट डिलीट करण्यास भाग पाडले. मात्र सदर पोस्ट व्हायरल झाल्या असून त्यावरून वादंग उठले आहे.
शमा मोहम्मद काय म्हणाल्या?
शमा मोहम्मद यांनी म्हटले होते, “रोहित शर्मा एक खेळाडू म्हणून खूप लठ्ठ आहे. त्याला वजन कमी करण्याची गरज असून तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात वाईट कर्णधार आहे.”
रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे, अशी एक्स पोस्ट अब्दुल गफार नामक युजरने केली होती. या पोस्टला उत्तर देताना शमा मोहम्मद यांनी प्रश्न विचारला, “रोहित शर्मामध्ये जागतिक दर्जाचे असे काय आहे? त्याचे पूर्वसुरी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, कपिल देव, रवि शास्त्री आणि इतरांकडे पाहा. त्यांच्या तुलनेत रोहित शर्मा एक साधारण कर्णधार आणि तितकाच सामान्य क्रिकेटपटू आहे. त्याला नशीबाने कर्णधार पदाची संधी मिळाली.
शमा मोहम्मद यांच्या या विधानानंतर भाजपाने त्यांच्यासह काँग्रेसला घेरले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला अनेकदा अपयश आले आहे, मग तेही चांगले कर्णधार नाहीत, अशी टीका भाजपाने केली.

डॉ. शमा मोहम्मद कोण आहेत?
डॉ. शमा मोहम्मद या काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. राजकीय कारकिर्दीशिवाय त्या एक दंत चिकित्सक आहेत. तसेच पत्रकार म्हणूनही त्यांनी काही काळ काम केले आहे.
कुवैत येथे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मंगळुरूच्या येनेपोया दंत चिकित्सक महाविद्यालयातून त्यांनी दंत शल्य चिकित्सक म्हणून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी दंत चिकित्सक म्हणून काही वर्ष काम केले. तसेच त्यानंतर पत्रकारिताही केली.

काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी शमा मोहम्मद यांनी झी न्यूजमध्ये पत्रकारिता केली होती. २०१८ साली त्यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय माध्यम समितीमध्ये निवड करण्यात आली आणि त्यानंतर त्या पक्षाच्या प्रवक्त्या म्हणून निवडल्या गेल्या. शमा मोहम्मद काँग्रेसच्या सक्रिय नेत्या आहेत. पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्या सहभागी असतात. तसेच पक्षाची ध्येय-धोरणे माध्यम आणि सोशल मीडियातून मांडण्यासाठी त्यांचा पुढाकार असतो.