हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सय्यद सलाऊद्दीनला काही दिवसांपूर्वीच अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीआधी अमेरिकेने ही घोषणा केली. सय्यद सलाऊद्दीन हा गेल्या २८ वर्षांपासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये वास्तव्य करतो आहे. तो पेशाने डॉक्टर आहे, जमात-ए इस्लामीसोबत काम करताना तो दहशतवादी कारवायांकडे वळला. त्याने हिजबुल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना सुरू केली. दहशतवादी कारवाया, कट रचणे, दहशतवाद्यांना तयार करणे यामध्ये सय्यदचा प्रमुख सहभाग आहे.
१९८७ मध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये सय्यद सलाऊद्दीन श्रीनगरमधल्या अमीराकदल या विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढला होता. ती तो हरला आणि त्यानंतर या दहशतवादी कारवायांकडे वळला. काश्मीर खोऱ्यात तरूणांची माथी भडकवण्यात सय्यदचा मोठा सहभाग आहे. मोहम्मद युसुफ शाह असे सय्यदचे मूळ नाव आहे, त्याचे वय ७१ वर्षे आहे. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हा प्रमुख असून त्याने आजवर अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत. हिजबुल मुजाहिद्दीनच्या कारवाया गेल्या काही महिन्यांमध्ये वाढल्या आहेत.
NIA अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने सय्यदला मोस्ट वाँटेड दहशतवादी जाहीर केले आहे. एप्रिल २०१४ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये हिजबुलने जे स्फोट घडवले त्यात १७ जण ठार झाले होते. या स्फोटाचा कटही याच सय्यदने आखला होता. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांची जबाबदारी सय्यदने घेतली आहे. २०१६ मध्ये भारतीय सैन्यदलातल्या जवानांची थडगी बांधू अशी दर्पोक्तीही त्याने केली होती. आता याच दहशतवाद्याला अमेरिकेने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. आजवर पाकिस्तानने अनेकदा आम्ही दहशतवादाला पाठिंबा देत नाही असे म्हटले आहे. मात्र ते दरवेळी तोंडावर पडले आहेत. निदान आता या हिजबुलच्या या दहशतवाद्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्यावर पाकिस्तानविरोधात भारत ठोस कारवाई करेल अशी अपेक्षा वाटते आहे.