इस्रायल आणि हमास यांच्यात जवळपास एका वर्षापासून युद्ध सुरू आहे. यामध्ये गाझापट्टीतील हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला रफाह या शहरावरील लष्करी हल्ले थांबवण्याचे आदेश दिले आहेत. इस्रायलने रफाहमधील युद्ध त्वरीत थांबवावे, असं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान, या दक्षिण आफ्रिकेने इस्रायलवर नरसंहाराचा आरोप केला होता. तेसच दक्षिण आफ्रिकेने आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडे युद्ध थांबवण्यासाठी याचिका केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलला रफाह शहरावरील लष्करी हल्ले थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या शुक्रवारी इस्रायलच्या विरोधात हा निकाल दिला. १५ न्यायाधीश या खटल्याची सुनावणी करत होते. त्यापैकी १३ न्यायाधीशांनी दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने निकाल दिला. हा निकाल देणाऱ्या १३ न्यायाधीशांमध्ये भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांचाही सहभाग आहे. दलवीर भंडारी हे जागतिक न्यायालयात भारताचे प्रतिनित्व करत आहेत.
हेही वाचा : युट्यूबर ध्रुव राठीला जीवे मारण्याची धमकी; एक्स पोस्टवर म्हणाला, “या सगळ्यामागे…”
दरम्यान, १३ न्यायाधीशांनी दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने निकाल दिला, तर दोन न्यायाधिशांनी विरोधात निकाल दिला. त्यामध्ये युगांडाचे न्यायाधीश ज्युलिया सेबुटिंडे आणि इस्रायल उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अहारोन बराक यांचा समावेश आहे. दरम्यान, या आंतरराष्ट्रीय न्यायालयात असलेले भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी कोण आहेत? जाणून घेऊयात.
दलवीर भंडारी कोण आहेत?
माहितीनुसार, दलवीर भंडारी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४७ रोजी राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात झाला. भंडारी यांनी राजस्थानमधील जोधपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. यानंतर अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल येथून कायद्यातील पदव्युत्तर पदवी मिळवली. काही काळ शिकागोत वकिली केली. त्यानंतर ते भारतात परतले. १९७३ ते १९७६ या काळात राजस्थान हायकोर्टात वकिली केली. तिथून १९७७ मध्ये दिल्ली हायकोर्टात त्यांनी वकिली केली. या क्षेत्रातील २३ वर्षांच्या अनुभवानंतर १९९१ साली त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक झाली होती.
त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. ऑक्टोबर २००५ मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. २०१२ मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात न्यायाधीश म्हणून निवड झाली. भंडारी यांची २०१२ मध्ये न्यायाधीशांच्या उर्वरित कार्यकाळासाठी पहिल्यांदा निवड झाली होती. त्यानंतर ब्रिटनने क्रिस्टोफर ग्रीनवुड यांचे नामांकन मागे घेतल्याने भंडारी यांची पुन्हा आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी निवड झाली होती. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश असताना भंडारी यांनी अनेक महत्वाचे निर्णय दिले होते.